मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 12,213 नवीन रुग्ण वाढले आहेत. देशात वाढते कोरोना रुग्ण पाहता याकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे. 8 हजारांचा जवळपास असणारी संख्या आता 12 हजारांवर पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन प्रकरणांमध्ये तब्बल 38.43 टक्क्यांची वाढ झालीये. त्यामुळे देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 58,215 वर पोहोचलीये. गेल्या आठवडाभरात वाढत असलेली रुग्ण संख्या आता चिंतेचं कारण ठरत आहेत. देशात कोरोनामुळे मृतांचा आकडा 5,24,803 वर पोहोचला आहे.


Omicron सारखे कोरोनाच्या प्रकारामुळे संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. त्याची लक्षणे आणि त्याचे दुष्परिणामही झपाट्याने बदलत आहेत. कोरोना आता फक्त फुफ्फुसावर हल्ला करत नाही, तर शरीराच्या कोणत्याही भागावर किंवा अवयवावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सामान्य सर्दीची लक्षणे आणि या आजाराव्यतिरिक्त इतरही काही लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. कोविडशी संबंधित असेच एक विचित्र लक्षण म्हणजे मुंग्या येणे किंवा संवेदना न होणे.


कोरोना रुग्णांना शरीरात एक विचित्र प्रकारची संवेदना किंवा सुन्नपणा जाणवत आहे. वैद्यकीय भाषेत याला पॅरेस्थेसिया म्हणतात. यामध्ये, रुग्णाला हात, कोपर, पाय किंवा तळवे आणि अगदी शरीराच्या इतर भागात जळजळ किंवा काटेरी अनुभव येतो.


या प्रकारची संवेदना वेदनारहित असते, परंतु ती तुमच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम करू शकते. 1,500 हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासात, बहुतेक लोकांमध्ये हे लक्षण आढळून आले. असे मानले जाते की संसर्ग शरीराच्या नसांवर परिणाम करतो, ज्यामुळे असे होऊ शकते.


ही लक्षणे काही आठवडे राहू शकतात. काही प्रकरणांमध्ये रुग्णांना ही वेदना 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ जाणवली. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी पेन सेंटरने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की त्यांच्या सुमारे 30% कोरोना रूग्णांमध्ये हे लक्षण दिसून आले आणि त्यापैकी सुमारे 6% लोकांना 3 महिन्यांपर्यंत याचा अनुभव आला.


शरीरात कोणत्याही भागात मुंग्या येणे यासारख्या किरकोळ आरोग्य समस्या काही दिवसातच कमी होऊ शकतात. बराच वेळ बसल्यावर आपले पाय कसे सुन्न होतात आणि काही वेळाने कसे बरे होतात हे आपण अनेकदा पाहिले आहे. संवेदना अनेक दिवस टिकून राहिल्यास, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.


सूचना : ही सामान्य माहिती आहे. जी कोणतेही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. कोणतीही समस्या असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.