नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना रोखण्यासाठी काही उपाय-योजना करण्यात येत आहे. मात्र, या उपाय-योजना करताना काही चुकीच्या गोष्टी घडल्याने याचा त्रास सर्वसामान्य गरिबांना भोगावा लागत आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशभरात डॉकडाऊन गरजेचे होते, मात्र त्याची अंमलबजावणीची पद्धत चुकीच्या पद्धतीने झाली आहे. यामुळे देशातील लाखो स्थलांतरीत मजुरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.



कोरोनाचे संकट देसासमोर आहे. मात्र, समस्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला आता व्यापक रणनीती आखण्याची आवश्यकता आहे. कारण कोरोनाचा फैलाव हा झपाट्याने होत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आमची इच्छाशक्ती मोठी असायला हवी, असेही त्या म्हणाल्या. 



दरम्यान, कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी आणि त्यासाठी लढाई करणारे डॉक्टर्स, परिचारीका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सरकारने पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना सूट, एन ९५ मास्क अशा गरजेच्या वस्तू लवकरात लवकर पुरवल्या गेल्या पाहिजेत, असे सोनिया म्हणाल्या.