Coronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश
देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.
मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत. या राज्यांत बाहेरून येणार्या लोकांची विमानतळ आणि सीमेवर कोरोना चाचणी ( Corona Test) केली जाणार आहे. त्यानंतरच दुसऱ्या राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. या वाढत्या घटनांमुळे या दोन राज्यांतील राज्य सरकारांनी काही शहरांमध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे.
महाराष्ट्र, राजस्थानमधून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग
राजस्थान आणि महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातने 'हाय रिस्क' असलेल्या महाराष्ट्रातील लोकांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. त्याचबरोबर राजस्थान सरकारने 21 मार्चपर्यंत जोधपूरमध्ये कलम 144 लागू केले आहे. अमरावती, मुंबई, नागपूर, वर्धा, अमरावती, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा येथे कडक सूचना महाराष्ट्र सरकारने केल्या आहेत.
कोविड-१९ नियमांचे कठोर पालन
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray Government) लोकांना कोरोनाबाबतच्या प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे अनिवार्य आहे. महाराष्ट्रात सर्व धार्मिक, सामाजिक आणि राजकीय समारंभांना बंदी आहे. राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी जमविणे प्रतिबंधित आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातने महाराष्ट्राच्या जवळच्या सर्व जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशात होणाऱ्या संसर्गाचा वेगवान प्रसारामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यामागील प्रमुख कारण आहे.
उत्तर प्रदेशात स्वतंत्र आदेशाची शक्यता
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा येथील कोविड -१९ च्या वाढत्या घटनांमुळे येथील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेश लवकरच या राज्यांमधून उत्तर प्रदेशात येणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. 'रेड झोन' येथून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी कोरोना टेस्ट आणि आयसोलालीन अनिवार्य करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.
आरोग्य महासंचालक डॉ. डी. एस. नेगी म्हणाले, उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांत घट झाली आहे. परंतु सर्व जिल्ह्यांमधील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. इतर राज्यांच्या सीमावर्ती भागात अधिक दक्षता घेतली जात आहे. राज्य सरकार दररोज 1.25 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करत आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की शिवरात्र आणि होळीसह आगामी उत्सव पाहता अधिकाऱ्यांना जागरुक राहण्यास सांगितले आहे. लोकांना सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले गेले आहे. मास्क घाला आणि नियमितपणे हात धुवा. कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करु नका, असे आवाहन केले आहे.