नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीच कसर सोडताना दिसत नाहीयेत. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सोबतच मंत्र्यांच्या स्तरावर मॉनिटरिंगही केलं जात आहे. आवश्यक वस्तूंची कमतरता भासू नये आणि राज्यांना कोणताच त्रास होऊ नये यासाठी कॅबिनेट मंत्र्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यांकडून जमिनीवरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना प्रभारी बनवण्यात आलं आहे. या मंत्र्यांना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून आढावा घ्यायला सांगण्यात आलं आहे. हे मंत्री गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेली नियमावली पाळण्यात अडचण तर येत नाही ना, याची माहिती घेणार आहेत. याशिवाय अडचणीमध्ये केंद्र सरकार राज्याला कशी मदत करु शकते, यावरही मंत्री लक्ष ठेवणार आहेत.


बाहेरुन किती लोकं आपल्या जिल्ह्यामध्ये परत आली आहेत. जिल्ह्यामध्ये किती जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. किती जण क्वारंटाईन आहेत, या सगळ्याची माहिती मंत्री घेतील. राज्यांची जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांना रोज पंतप्रधान कार्यालयाला व्हायरसच्या संक्रमणाविषयी आणि बचाव कार्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, राजस्थान आणि पंजाबची जबाबदारी गजेंद्रसिंह शेखावत, आसामसाठी जनरल व्हीके सिंग, उत्तर प्रदेशसाठी राजनाथ सिंग, संजीव बाल्यान, महेंद्रनाथ पांडे, कृष्णपाल गुर्जर, बिहारसाठी रवीशंकर प्रसाद आणि रामविलास पासवान, ओडिसासाठी धर्मेंद्र प्रधान, छत्तीसगडसाठी अर्जुन मुंडा, झारखंडसाठी मुख्तार अब्बास नकवी यांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे.