नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य शासनाकडून coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही नवे नियम जारी करण्यात आले. आता त्यातच केंद्रेनंही अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. ज्यामध्ये सर्वसामान्यांचा वावर, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार याविषयी काही नियम आखून दिल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकामध्ये १ जुलै पासून ३१ जुलैपर्यंतच्या काळात शाळा, सिनेमागृह, शिकवणी वर्ग बंद राहतील असे निर्देश दिले आहेत. 


रात्री दहा वाजल्यापासून सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम असेल. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं, मेट्रो सर्व्हिस, जलतरण तलाव, बार, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम यांवरही या काळात निर्बंध असणार आहेत. ज्या उड्डाणांना गृहमंत्रालयाची रितसर परवानगी आहे ती वगळता इतर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद राहणार आहेत.


कंटेन्मेंट क्षेत्रांबाहेर काय सुरु आणि काय बंद ? 


- गृहमंत्रालयाच्या निर्देशांनुसार शाळा महाविद्यालयं आणि प्रशिक्षण केंद्र ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. सर्व राज्याच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. १५ जुलैपासून राज्य आणि केंद्र सरकारची प्रशिक्षण केंद्र सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी वेगळा एसओपी जारी करण्यात येणार आहे. 


- कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनचं सक्तीनं पालन केलं जाणार आहे. ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद असणार आहेत.



 


- अमुक एका परिसरात दुकानं सुरु असली तरीही एका वेळी दुकानात पाचजणांनाच परवानगी देण्यात आली आहे. जेथे सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन केलं गेलं असेल. 


- रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत सक्तीची संचारबंदी असली तरीही आवश्यक ती मालवाहतूक, विविध शिफ्टमध्ये काम करणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, किंवा इतर कर्मचारी यांना मात्र यातून वगळण्यात आलं आहे.