कोरोनासोबत जगण्याची सवय करा; मुख्यमंत्र्यांचा इशारा
वेळीच पावलं उचलली नसली तर...
नवी दिल्ली : देशभरात Coronavirus कोरोनाचं थैमान सुरु असतानाच काही ठिकाणांवर कोरोनाचा असणारा प्रभाव आणि या परिस्थितीतही तेथे उचलली जाणारी महत्त्वाची अशी प्रतिबंधात्मक पावलं ही अनेकांसाठी आदर्श प्रस्थापित करत आहेत. सध्या अशीच चर्चा सुरु आहे ती म्हणजे दिल्लीतील परिस्थितीची. या मुद्द्यावर खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच महत्त्वाची माहिती दिली.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केजरीवाल यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि या परिस्थितीचा सामाना करणारा आपला देश या विषयांवर त्यांची मतं मांडली. कोरोना व्हायरसवर ल़ॉकडाऊन हा काही उपाय नाही. पण, या मार्गाने कोरोनाला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असं ते म्हणाले. शिवाय केंद्र सरकार आणि पंतप्रधानांकडून वेळीच घोण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं.
मुळात कोरोना विषाणूवर अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रभावी लस सापडलेली नाही. या परिस्थिती विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडला गेला. पण, त्यामुळे काही या विषाणूचा खात्मा होणार नाही. असं असलं तरीही वाढत्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यास नक्कीच मदत होईल, असं ते म्हणाले.
दिल्लीमध्येही वेळीच काही महत्त्वाचे निर्णय घेतले नसते किंवा प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यात दिरंगाई केली असतील तर येथील परिस्थितीही वेगळी असती हे वास्तव त्यांनी समोर ठेवलं. .... तर दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या ही २५ हजारांच्याही पलीकडे गेली असती, म्हणत त्यांनी प्रतिबंधात्मक पावलं उचलली जाण्यावर अधिक भर दिला.
कोरोनाशी अशी झुंज देत आहे दिल्ली...
मरकज आणि दिल्लीतील एकंदर परिस्थिती पाहता वातावरण तसं तणावाचं होतं. पण, यातही सावधगिरी बाळगत जवळपास ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित असल्याचं आढळल्यानंतर, ३५ हजारहून अधिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं हे सांगत दिल्ली कोरोनाशी झुंज देत असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.
कोरोना, त्यामागोमाग येणारं आर्थिक संकट यासाठी प्रत्येक राज्याने सर्वतोपरी तयार असणं आवश्यक आहे. किंबहुना आम्हीसुद्धा या परिस्थितीचा सामान करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी प्राथमिक पातळीवर कोविड केंद्र, पीपीई किट, अँटीबॉडी टेस्ट किट यासह आपण तयार असल्याचं सांगत येत्या काळाता या कोरोनासोबतच जगण्याची सवय आपण केली पाहिजे असं सूचक वक्तव्य करत कोरोनाचं हे सावट इतक्या लवकर संपणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.