मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरसला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगातील ११४ देशांमधील १ लाख १८ हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार २९१ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळं बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर पॅन्डेमिक अर्थात 'जागतिक साथीचा रोग' म्हणून कोरोना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी ही घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हीसांना सरकारने स्थगिती दिली आहे. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हीसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसांना वगळण्यात आले आहेत. परदेशी नागरिकांना भारतात १५ एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी देण्यात आली असून अद्याप आयपीएलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 


राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११वर गेली आहे. मुंबई, पुणे आणि नागपुरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात ८ रूग्ण, मुंबईत २ रूग्ण तर नागपुरातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील दाम्पत्य दुबईला फिरायला गेले होते. त्यांच्यामुळे कोरोनाने पुण्यात प्रवेश केला. तर नागपुरातील रूग्ण हा अमेरिकेहून आल्याच सांगण्यात येत आहे. 


जे परदेशातून आले असतील त्यांनी गर्दीपासून लांब राहावं, तसंच घरात वेगळं राहावं. गर्दीचे आणि सणावाराचे कार्यक्रम टाळा. सगळ्यांनी मास्क लावून फिरण्याची गरज नाही, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. शाळा आणि कॉलेज बंद करण्याबाबत आज तरी निर्णय घेतलेला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शनिवारी किंवा रविवारी अधिवेशनाचं कामकाज पूर्ण करु, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. 



कोरोनाचे रुग्ण राज्यात आढळले असले तरी लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. लोकांनी खबरदारी मात्र घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. महाराष्ट्रात सापडलेले कोरोनाचे रुग्णांची प्रकृती गंभीर किंवा अतिगंभीर नाही, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.