कोरोनाची धास्ती; गोव्यात पुन्हा `जनता कर्फ्यू`
अनेक जिल्हे आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचं सत्र सुरु आहे
पणजी : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अनेक जिल्हे आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचं सत्र सुरु आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये टाळेबंदीचे नियम पुन्हा लागू करण्यात आल्यानंतर आणखी एका राज्यात पुन्हा एकदा 'जनता कर्फ्यू' घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकेकाळी कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या गोवा Goa या राज्यात पुन्हा कोरोनाची धास्ती पाहायला मिळत असल्यामुळं 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार असल्याचं खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं.
बुधवारी रात्रीपासून हा कर्फ्यू लागू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. १० ऑगस्टपर्यंत राज्यात जनता कर्फ्यूचं पालन करण्यात येणार आहे. रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं पालन केलं जाणार आहे. यादरम्यान फक्त वैद्यकीय सेवा सुरु राहतील. तर, शुक्रवार ते रविवार या कालावधीत राज्यात कडकडीत टाळेबंदी पाळण्यात येईल असंही सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.
राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता मुख्यमंत्री प्रमोद सावंद यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. मागील चोवीस तासांमध्ये गोव्यात कोरोनाचे १७९ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात २७५३ कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील १६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ११२८ रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत.
गोव्यात कोरोनाची बाधा झाल्यामुळं आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या ठिकाणी रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५८.७३ टक्क्यांवर आहे. त्यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सावधगिचा इशारा म्हणून राज्यात 'जनता कर्फ्यू'चा निर्णय घेण्यात आला आहे.