नवी दिल्ली : Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिली. ज्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सोमवारी देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुन्हा एकदा कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन ही अतिशय महत्त्वाची अशी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत मोदींची ही तिसरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक असेल. कोरोनाशी दोन हात करण्याव्यतिरिक्त बैठकीत आणखीही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये लॉकडाऊन हा टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याबाबत विचारविनिमय केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांतून मंदावलेल्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी काही पर्याय सुचवले जाऊ शकतात. तर, लॉकडाऊन हा विविध मार्गांनी आणि विविध टप्प्यांत शिथिल करण्यात येऊ शकतो. असं असलं तरीही मुंबई, पुणे, दिल्ली येथे मात्र लॉकडाऊन लांबण्याची चिन्हं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, आणखीही काही राज्यांमध्ये सतर्कता म्हणून ल़ॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. 



 


दरम्यान, महाराष्ट्रात ३ मे नंतर कोरोनाच्या प्रसाराची परिस्थिती पाहता लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यामुळे आता पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात कोणत्या निर्णयावर पोहोचतात आणि या बैठकीतून काय निष्कर्ष निघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आणि त्या पूर्ततेसाठी काही चर्चा होते का, हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.