नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश संकटात आहे. अनेक व्यवहार ठप्प असल्याने मोठ्या नुकसानीची शक्यताही आहे. पण या सर्व परिस्थितीत सोन्याला मात्र आणखी झळाळी येण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात-जगात आर्थिक संकट उद्भवतं त्यावेळी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीसाठी पहिली पसंत सोन्याला असल्याचं पाहायला मिळतं. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात भारतात सोनं 50000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या उच्चांकी स्तरावर पोहचण्याची शक्यता आहे.


इंडिया बुलियन ऍन्ड ज्वेलर्स असोसिएशनचे नॅशनल सेक्रेटरी सुरेंद्र मेहता यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, भविष्यात भारतात सोन्याचा भाव 50000 रुपयांवर पोहचू शकतो. हा भाव 52000 रुपये प्रति 10 ग्रॅमवरही पोहचू शकत असल्याचं ते म्हणाले. संकटसमयी सोनं उपयोगी ठरतं आणि ज्यावेळी आर्थिक आकडेवारीत घट होते त्यावेळी गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढत असल्याचं ते म्हणाले.


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे सोनं खरेदीवरही ब्रेक लागला आहे. पण 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर सराफा बाजारात अक्षय तृतीयासाठी तयारी सुरु होऊ शकते. देशभरात अक्षय तृतीया सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. यावेळी 26 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. त्यामुळे सोनं व्यापारांना अक्षय तृतीयादिवशी अपेक्षा आहेत. 


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हसह अनेक देशांतील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. याचा सोन्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.