नवी दिल्ली: देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना या चिंतेत भर टाकणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. सध्या भारतामधील Covid-19 (कोरोना व्हायरस) हा दुसऱ्या टप्प्यात आहे. यामध्ये केवळ कोरोनाग्रस्त देशांमधून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आल्याने कोरोना झालेल्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव याच टप्प्यात रोखण्यासाठी किंवा ही प्रक्रिया लांबवण्यासाठी सध्या केंद्र सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे चार संशयित रुग्ण पळाले


भारतीय वैद्यकीय संशोधन समितीचे (IMC) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी दिवसांमध्ये कोरोनाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे भारतामध्ये फैलावू लागेल. त्यामुळे आणखी ३० दिवस कोरोनाला रोखून धरणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोनाला स्थानिक पातळीवरच मर्यादित ठेवून त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. कोरोना विषाणू रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास आणि अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरल्यास भारतात हा विषाणू आणखी तीव्रतेने पसरण्याची शक्यता आहे.


...तर कोरोनाग्रस्तांना भोगावा लागणार २१ वर्ष तुरूंगवास


अन्यथा तिसऱ्या टप्प्यात कोरोना देशभरात संसर्गजन्य आजाराप्रमाणे फैलावण्यास सुरुवात होईल. यानंतर चौथ्या टप्प्यात कोरोना साथीच्या रोगाचे स्वरुप धारण करेल. एकदा का कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे फैलावण्यास सुरुवात झाली की प्रादुर्भावाचे चक्र नक्की कधी संपेल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. सध्या इटली आणि चीनमध्ये Covid-19 व्हायरस सहाव्या टप्प्यात आहे. या दोन्ही देशांमध्ये कोरोनाच्या विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. चीनमध्ये जवळपास तीन हजार तर इटलीमध्ये एका हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारताला Covid-19 व्हायरस दुसऱ्या टप्प्यातच रोखून धरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेले ८४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित लोकांपैकी बहुतांश जणांना सौम्य कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते.