नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 300च्या वर पोहचली आहे. आतापर्यंत 315 रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत हा आकडा 27 झाला आहे. केरळमध्ये 52, राजस्थानमध्ये 25, महाराष्ट्रात 64, तर पंजाब-गुजरातमध्ये 13 लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. आसाममध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. झारखंडहून आसाम पोहचलेल्या साडेचार वर्षांच्या चिमुकलीला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.


गुजरातमध्ये आंशिक लॉकडाऊन -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात सरकारने, अहमदाबाद, सूरत, राजकोट आणि वडोदरामध्ये आंशिक लॉकडाऊन लागू करणार आला असल्याचं सांगितलंय. गुजरातमध्ये 13 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.


राजस्थान 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन -


राजस्थानमध्ये सरकारने कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण राजस्थान 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण बाजार आणि इतर आस्थापनांसह शासकीय कार्यालयंही बंद ठेवण्यात येणार आहेत.  


महाराष्ट्र -


महाराष्ट्रात शनिवारी 12 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 64 वर पोहचलाय. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. 12 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी, 8 रुग्ण मुंबई, 2 पुणे, 1 कल्याण आणि 1 यवतमाळमध्ये आढळून आले. या 12 रुग्णांपैकी 10 रुग्ण परदेशातून परतलेले आहेत. 


शनिवारी परदेशातून आलेल्या 275 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्त देशांतून 1861 प्रवासी आले आहेत. रविवारी कुर्लामध्ये कोरोना संशयित 8 रुग्ण आढळून आले. हे सर्व संशयित दुबईहून मुंबईत आले आणि त्यांना मुंबईहून पुन्हा संध्याकाळी प्रयागराज येथे जायचं होतं. या सर्वांच्या हातावर home quarantineचा स्टॅम्प लावण्यात आला आहे.


दिल्ली -


राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोरोनाच्या धोक्यामुळे दिल्लीत मिळणाऱ्या रेशनचा साठा वाढवला असून मोफत देण्यात निर्णय घेतला आहे. याअंतर्गत 72 लाख लोकांना प्रत्येक महिन्याला 7.5 किलो रेशन मोफत देण्यात येणार आहे. नाईट शेल्टरमध्ये मोफत जेवण देण्यात येणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी, दिल्लीतील वृद्ध, विधवा आणि अपंगांना मिळणारं पेन्शन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.



कोरोना व्हायरसमुळे ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीने नवीन लायसन्स बनवण्यावर बंदी घातली आहे. हा नियम आजपासून लागू करण्यात आला असून दिल्लीत कोणालाही नवीन लायसन्स मिळणार नाही. त्याशिवाय 90 टक्के सेवा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. 


त्याशिवाय, सरकारने ऑटोरिक्षामध्ये मोफत निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली आहे. 



ओडिशा -


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राजधानीसह प्रदेशातील 40 टक्के भाग एक आठवड्यासाठी लॉक डाऊन केला आहे. यात 5 जिल्हे आणि 8 प्रमुख शहरांचा समावेश आहे.



लोकांना ICMR, इंडियन कॉउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारा देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना व्हायरसपासून बचावाविषयी माहिती देण्यात आली आहे.