जगभरात कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा दीड लाखांवर; जाणून घ्या भारतात काय आहे स्थिती
गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. जगात कोरोनामुळे आतपर्यंत 1 लाख 65 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 24 लाख 6 हजार 800वर पोहचली आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 हजार 265पर्यंत पोहचला आहे. तर आतापर्यंत 2547 कोरोनातून बरे झाले आहेत. भारतात 543 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
- गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे.
- गेल्या 24 तासांत 316 लोक बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचाही हा आतापर्यंतचा एका दिवसांतील सर्वात मोठा आकडा आहे.
- महाराष्ट्रात 24 तासांत करोनाचे 552 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 3651 कोरोनाबाधित असून 211 जणांचा मृत्यू झाला आहे.
- गोवा देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य ठरलं आहे. गोव्यात आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. गोव्यात 7 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र हे सातही जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- देशात आता 54 जिल्हे असे आहेत जिथे गेल्या 14 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही.
- मणिपूरही कोरोनामुक्त झालं आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली. राज्यात कोरोनाचे 2 रुग्ण होते. ते दोघेही पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील कठोर नियमांमुळे कोरोनाचे नवे रुग्ण आढळले नाहीत.
- अमेरिकामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 हजार 500 वर पोहचली आहे. एकट्या अमेरिकेत जवळपास 7 लाख 63 हजार लोक संसर्गग्रस्त आहेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 977 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- लंडनमध्ये ब्रिटनच्या पहिल्या कोरोना रुग्णाला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. 55 वर्षीय रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला. रुग्णालयाच्या संचालकांनी हा आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचं सांगितलं.
- स्पेनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 20 हजार 453 लोक दगावले आहेत. तर 1 लाख 98 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 77 हजार 357 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
- इटलीत कोरोना मृतांचा आकडा 23 हजार 660वर पोहचला आहे. तर 1 लाख 78 हजार 972 लोक कोरोनाबाधित आहेत. इटलीत आतापर्यंत 47 हजार लोक बरे झाले आहेत.
- फ्रान्समध्ये 19 हजार 718 लोक कोरोनामुळे दगावले आहेत. तर सध्या 1 लाख 53 हजार लोकांवर उपचार सुरु आहेत. फ्रान्समध्ये 36 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.