चंदीगढ: काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा हात तलवारीने छाटला होता. या घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता पंजाब सरकारने या पोलीस अधिकाऱ्याने संकटाच्या काळात दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेतली आहे. या कार्याबद्दल सहायक पोलीस उपनिरीक्षक हरजित सिंग यांना बढती देण्यात आल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाळाच्या जन्मानंतर कोरोनाशी लढण्यासाठी कामावर परतली कर्तव्यनिष्ठ 'आई'


हरजित सिंग यांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इतर तीन पोलिसांचाही शौर्यपदक देऊन गौरव करण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वी चंदीगढच्या सनोर भाजीपाला मार्केटच्या परिसरात काहीजण वाहन घेऊन फिरत होते. हे सर्वजण निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते. यावेळी पोलिसांनी संबंधितांकडे कर्फ्यु पासची विचारण केली. मात्र, या टोळक्याकडे कोणतेही पास नसल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. 



हा वाद वाढल्यानंतर या टोळक्याने हरजित सिंग यांचा हात तलवारीने कापून टाकला होता. मात्र, यानंतरही हरजित सिंग यांनी डगमगून न जाता कापलेला हात उचलून तातडीने रुग्णालय गाठले होते. यानंतर त्यांच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करून त्यांचा हात पुन्हा बसवण्यात आला होता. या घटनेनंतर हल्लेखोर जवळच्या एका गुरुद्वारात लपून बसले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत या सगळ्यांना अटक केली होती.