बाळाच्या जन्मानंतर कोरोनाशी लढण्यासाठी कामावर परतली कर्तव्यनिष्ठ 'आई'

या आईला संपूर्ण देशाने सलाम केला आहे.   

Updated: Apr 13, 2020, 04:45 PM IST
बाळाच्या जन्मानंतर कोरोनाशी लढण्यासाठी कामावर परतली कर्तव्यनिष्ठ 'आई' title=
छाया सौजन्य- ट्विटर

विशाखापट्टणम :  Coronavirus कोरोना विषाणूने साऱ्या देशालाच विशखा घातलेलं असताना आणि मानवी जीवनाची घडी विस्कटलेली असतानाच प्रशासकीय आणि अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी कंबर कसली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून ही मंडळी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. अगदी तहानभूक विसरून आणि स्वत:च्या कुटुंबाला बाजूला ठेवून. 

सध्या अशाच मंडळींपैकी एक असणाऱ्या जी. श्रीजना नावाच्या एक महिला आयएएस अधिकारी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ वृत्तीमुळे अनेकांपुढेच आदर्श प्रस्थापिक करत आहेत.  Greater Visakhapatnam Municipal Corporation (GVMC) येथे सेवेत असणाऱ्या श्रीजना या खऱ्या अर्थाने कोरोना वॉरियर ठरत आहेत. 

गरोदरपणाच्या काळात, अगदी प्रसूतीच्या काही तासांपूर्वीपर्यंत श्रीजना या त्यांच्या कामात व्यग्र होत्या. ज्यानंतर त्यांनी एका बाळाला जन्म दिला. मातृत्त्वाच्या या नव्या वळणाची सुरुवात होताच, बाळाच्या जन्मानंतर अवघ्या २२ दिवसांनी श्रीजना या पुन्हा एकदा त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी कामावर रुजू झाल्या आहेत. 

मुलाच्या जन्मानंतर लगेचच देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यादरम्यानच्या काळात बाळासमवेत वेळ व्यतीत केल्यानंतर कोरोनाशी देशाचा लढा सुरु असतानाच त्यांनी आपली भूमिका बजावणं केंद्रस्थानी ठेवलं. यामध्ये पती आणि आपल्या आईची फार मदत झाल्याचं त्यांनी न विसरता सांगितलं. 

'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार दर चार तासांनी श्रीजना त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळांनुसार घरी जातात. त्यादरम्यानचा वेळ त्यांचे पती आणि त्यांची आई या बाळाची काळजी घेतात. सध्याच्या घडीला एक जबाबदार अधिकारी म्हणून आपलं कार्यालयात असणं महत्त्वाचं असल्याची बाब जाणत त्यांनी कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे, तर कोरोनाविरोधातील या लढ्यात त्यासुद्धा सर्वांच्या साथीने आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. अशा या कर्तव्यनिष्ठ आईला सारा देश सध्या सलाम करत आहे.