नवी दिल्ली : प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या अथक परिश्रमांनंतरही देशातील कोरोना coronavirus रुग्णांचा वाढता आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये दर दिवशी देशभरात होणारी कोरोना रुग्णांची वाढ ही चिंतेत टाकणारी आहे. कारण हा आकडा सातत्यानं ४५- ते ५० हजारांच्या दरम्यान येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ४७,७०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. परिणामी देशातील एकूण रुग्णसंख्या १४,८३,१५६ इतकी झाली आहे. चोवीस तासांमध्ये ६५४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळं आता संपूर्ण देशात या विषाणूमुळं प्राण गमवावे लागलेल्यांचा आकडा ३३४२५ वर पोहोचला आहे. 


आतापर्यंत देशात जितक्या वेगानं कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, तितक्याच वेगानं रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची बाब समोर येत आहे. आजमितीस कोरोनातून ९५२७४३ रुग्ण सावरले आहेत. ज्यामुळं रिकव्हरी रेट ६४.२३ टक्के इतका झाला आहे. तर, पॉझिटीव्हिटी रेट ९.०३ टक्क्यांवर पोहोचला आहे. 




एकिकडे देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत असतानाच आता साऱ्या जगासोबत देशातील नागरिकांनाही प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे त्यावरील प्रतिबंधात्मक लसीची. सोमवारपासून या लसीची भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऍण्ड एसयूएम रुग्णालयात मानवी चाचणी सुरु झाली आहे. तेव्हा आता या चाचणीच्या निष्कर्षांवरच साऱ्यांच्या नजरा आहेत.