गेल्या २४ तासांत देशात सर्वाधिक ६२ लोकांचा मृत्यू तर १५४३ नवे रुग्ण
एकाच दिवशी मृत्यू झालेल्यांपैकी हा सर्वाधिक आकडा आहे
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना संक्रमणाचे वाढणारे आकडे देशाची चिंता वाढवणारे आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1543 नवे रुग्ण आढळले. तर एकाच दिवसांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाच दिवशी मृत्यू झालेल्यांपैकी हा सर्वाधिक आकडा आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाचे 29 हजार 435 रुग्ण आढळले आहेत. तर 934 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात 6 हजार 869 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8590वर पोहचला आहे. त्यानंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांमध्ये गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 3548 रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत 3108 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. तर देशातील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आलेली नाही.
देशातील गोवा, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, इंफाळसह तीन केंद्रशासित प्रदेश कोरोनामुक्त झाले आहेत.
सोमवारी पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सद्वारे चर्चा केली. ओडिशा, गोवा, हिमाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात येण्याबाबत आपलं मत मांडलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली असून गोव्यात केवळ आर्थिक व्यवहार सुरु राहवेत, परंतु राज्याच्या सीमा बंदच ठेवण्यात याव्यात, असं ते म्हणाले. तर मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढवण्यात यावा, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्या जिल्ह्यांना दिलासा द्यावा, असा प्रस्ताव ठेवला आहे.