केरळात एकाच दिवशी आढळले Coronavirus चे 111 रुग्ण; केंद्र शासनाकडून निर्देश जारी
Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.
Corona Cases India : कोरोना ससंर्गामुळं चीननं जगाची चिंता वाढवली, तर आता केरळ राज्य भारताची चिंता वाढवताना दिसत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे इथं वाढलेली कोरोना रुग्णसंख्या. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही केरळमद्ये या ससंर्गानं अनेकांनाच आपल्या विळख्यात घेतल्याचं पाहायला मिळालं. आता डिसेंबर महिन्यामध्ये देशभरात तापमानात घट होत असतानाच केरळात पुन्हा तेच चित्र पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील या राज्यामध्ये कोरोनाच्या JN.1 या सबव्हेरिएंटनं चिंतेत भर टाकली आहे. त्यातच केरळात सोमवारी म्हणजेच 18 डिसेंबर 2023 रोजी कोरोनाच्या तब्बल 111 रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळं यंत्रणांना धक्का बसला.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला केरळमध्ये 1634 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असन, त्यामधील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गणती करायची झाल्यास तेव्हापासून आतापर्यंत अर्थात गेल्या तीन वर्षांमध्ये केरळमधील कोरोना रुग्णांची संख्या 72 हजार 53 इतकी झाली आहे.
दरम्यान, केरळात कोरोनाचा नवा व्हेरिएंट पुन्हा हातपाय पसरू लागलेला असतानाच आता केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, राज्याराज्यांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर नागरिकांनाही आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता केरळासह इतरही राज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांवर काम करत काही नियम आखत पर्यायी व्यवस्था उभ्या कराव्यात.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कोरोनाच्या धर्तीवर आखून दिलेल्या नियमावलीचं पालन काटेकोरपणे करावं.
आरोग्य सचिवांपर्यंत कोरोना रुग्णांची माहिती जलदगतीनं पोहोचवण्यासाठी इन्फ्लूएंजा, श्वसनविकार आणि तत्सम आजारपणांविषयी जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये नियमित नोंदी कराव्यात.
देशातील सर्वच राज्यांनी कोरोनाच्या धर्तीवर चाचणी प्रक्रियेत पारदर्शकता बाळगावी. आरटीपीसीआर आणि अँटीजन चाचण्या सातत्यानं सुरु ठेवाव्यात.
हेसुद्धा वाचा : Weather update : 'या' भागात पावसाचा रेड अलर्ट, विदर्भात मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा
नवा व्हेरिएंट आणि लक्षणं
कोरोनाचा सब-व्हेरिएंट जेएन.1 (बीए.2.86.1.1) 2023 मध्येच अखेरच्या काही दिवसांमध्ये समोर आलेला व्हेरिएंट आहे. ज्याचा संबंध सार्स सीओवी-2 च्या बीए.2.86 (पिरोला) शी जोडला जात आहे. सध्याच्या घडीला अमेरिका, चीन, सिंगापुर आणि भारतामध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सर्दी- पडसं, डोकेदुखीचा समावेश आहे. सध्याच्या घडीला या संसर्गानं भारतामध्ये हातपाय पसरले नसले तरीही सुरुवातीला या संकटावर मात करण्यासाठी म्हणून आरोग्य यंत्रणा जाणीवपूर्वक कठोर पावलं उचलताना दिसत आहेत.