दिल्ली कार्यक्रम : कोरोनाचा होतोय फैलाव, आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मौलाना साद हे २८ मार्चपासून गायब आहेत.
नवी दिल्ली : निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मौलाना साद हे २८ मार्चपासून गायब आहेत.
दिल्लीतल्या निझामुद्दीन भागात जे घडले, त्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली आहे. निझामुद्दीन भागातल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातून जवळपास १८३० जण सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा तेलंगणात मृत्यू झाला आहे. या सर्व घडामोडींनंतर केंद्र आणि राज्य सरकारांची झोप उडाली आहे. कारण देशातल्या अनेक भागात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आढळून येतायत. त्याचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर येत आहे.
निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभागी झालेले १३० हून अधिक जण पुणे आणि परिसरात असल्याचं समोर आलंय. १४ जणांना पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. तर आणखी १८ जणांचा शोध सुरू करण्यात आलाय. मराठवाड्यातूनही या मरकजमध्ये मोठ्या संख्येनं लोक गेल्याचं पुढं आलंय. औरंगाबादमधून ४७ जण मरकजमध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातले २१ जणही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमरावतीतील पाच जणांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सात जण उपस्थित असल्याचंही स्पष्ट झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातले १२ जण मरकज कार्यक्रमात सहभागी झाले होते. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्याला असलेले ५ जण परत आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलंय. उर्वरीत ७ जण अजूनही जिल्ह्यात परत आलेले नाहीत. यापैकी काहीजण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात अथवा दुसऱ्या राज्यात गेल्याची अथवा दिल्लीतच थांबले असण्याची शक्यता आहे. तरीही प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.