Coronavirus Outbreak In India : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने केंद्र सरकार सतर्क झाले. केंद्राकडून राज्यांना तात्काळ कोरोनाबाबत सूचना जारी केल्यात. सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी तसेच सरकारी कार्यालये, शाळा - महाविद्यालयांत मास्क वापरण्याबाबत आवाहन केले आहे. कोरोनाची चिंता व्यक्त होत असताना आता दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना तज्ज्ञांचे मते, कोरोनाबाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे आणि ते कमी राहण्याची अपेक्षा आहे.


देशात सध्या जवळपास 45 हजार अ‍ॅक्टीव्ह रुग्ण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोविड रुग्णांची संख्या वाढली असली तरी कोरोना स्थानिक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे पुढील 10-12 दिवसांपर्यंत कोरोना रुग्णांत वाढ होत राहील. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णवाढ कमी होईल. कोविड रुग्णांमध्ये सध्याची वाढ SBB.1.16 या व्हेरिएंटमुळे आहे. जी ओमिक्रॉनचा उप-स्ट्रेन आहे. दरम्यान, देशात कोरोना रूग्णवाढ चिंताजनकरित्या वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या जवळपास 45 हजार अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. देशाचा रोजचा पॉझिटिव्हिटी रेटही जवळपास साडेचार टक्क्यांवर पोहोचला आहे. 10 आणि 11 एप्रिल रोजी कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमध्ये रुग्णालयाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशव्यापी मॉकडील घेण्यात आले. सध्या देशभरात 10 लाखांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी 3 लाखांहून अधिक ऑक्सिजन सुविधेने सुसज्ज आहेत, 90,785 आयसीयू बेड आहेत आणि 54,040 आयसीयू-कम-व्हेंटिलेटर बेड आहेत.


 रुग्णवाढीमागे XBB.1.16 हा व्हेरियंट


सातत्याने होत असलेल्या कोरोना रुग्णवाढीकडे आयसीएमआरचं बारकाईन लक्ष आहे. देशात सध्या होत असलेल्या रूग्णवाढीमागे XBB.1.16 हा व्हेरियंट असल्याचं समोर आले आहे. देशातल्या सध्याचे जवळपास 80 ते 90 टक्के रूग्ण XBB.1.16 चे आहेत. पुढील 10 ते 12 दिवस महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काळजी घेतली, प्रतिबंधात्मक उपाय केले तर त्यानंतर कोरोना रुग्णवाढ कमी होऊ शकते. पण दुर्लक्ष केले तर मात्र रुग्णवाढ वाढत जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 


दरम्यान, वाढलेल्या मृत्युदराचा कोणताही पुरावा नाही. XBB.1.16 चा वाढीचा वेग फेब्रुवारीमध्ये 21.6 टक्क्यांवरुन या वर्षी मार्चमध्ये 35.8 टक्क्यांपर्यंत वाढला. तथापि, रुग्णालयात दाखल किंवा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी भारतात कोरोना विषाणू संसर्गाची 7,830 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी 223 दिवसांतील सर्वाधिक आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 40,215 झाली आहे.