मोठी बातमी! भारतातील ३ राज्य कोरोनामुक्त
नकारात्मक वातावरण मनाला दिलासा देणारी बातमी
मुंबई : कोरोना व्हायरसचा थैमान सुरू आहे. पण या सगळ्यात एक समाधानकारक आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातील ३ राज्य कोरोनामुक्त झाले असून त्या राज्यांनी कोरोनाशी दोन हात करून आपल्या राज्याला कोरोना फ्री केलं आहे. आपण घरात राहून सरकारने दिलेले सगळे नियम पाळून कोरोनावर मात करू शकतो हे या ३ राज्यांनी दाखवून दिलं आहे.
त्रिपुरामधील सर्व कोरोनाबाधित रूग्ण ठणठणीत बरे झाले असून या अगोदर गोवा आणि मणिपुर या दोन राज्यांनी कोरोनावर मात केली होती. गोवा सारख राज्य जिथे परदेशी पर्यटकांची उपस्थिती सर्वाधिक असते. त्या गोव्याने कोरोनावर मात केली आहे. या तीन राज्यांनी कोरोनावर मात केल्यामुळे इतर राज्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (गोवा कोरोनामुक्त होण्याची ७ ठळक कारणं)
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी ट्विट करून ही आनंदाची आणि बळ देणारी बातमी शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, कोरोनाबाधित दुसऱ्या रूग्णाचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहे. याप्रमाणे आमचं राज्य हे कोरोनामुक्त झालं आहे.
बिप्लव यांनी सांगितले की, सगळे नागरिक सोशल डिस्टिन्शिंग आणि सरकारी गाइडलाइन पाळत आहेत. यामुळे मी सगळ्याच नागरिकांना विनंती करतो की, घरी रहा आणि सुरक्षित राहा. यावेळी त्यांनी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या सगळ्यांचे आभार मानले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २१ हजार ३९३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ४२५८ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. तर ६८१ लोकांचा मृत्यू झाला आहे.