`Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..`; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला
Double Digit Appraisal Salary Hike: सध्या अनेक कंपन्यांमध्ये पगारवाढीसंदर्भातील वार्षिक अहवाल जमा करणे, फॉर्म भरणे यासारख्या गोष्टी सुरु असून त्याचसंदर्भात एका एका नवउद्योजकाने कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा म्हणजेच अॅप्रायझलची कामं सुरु आहेत. अनेक कॉर्परेट कंपन्या सध्या कर्मचाऱ्यांनी मागील वर्षभरामध्ये काय आणि कसं काम केलं यासंदर्भातील आढावा घेऊन त्यांना किती टक्के वार्षिक पगारवाढ द्यायची हे निश्चित करण्यास व्यस्त आहेत. मात्र मागील काही महिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या अहवालांमध्ये भारतीय कंपन्या यंदाच्या वर्षी सरासरी 9.6 टक्के पगारवाढ देतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
स्टार्टअप सुरु करणाऱ्याचा सल्ला
एकीकडे दिवस-रात्र कंपनीत काम करुन बॉसला इम्प्रेस करायचं आणि दुसरीकडे साधी डबल डिजीट पगारवाढही मिळत नाही, अशी तक्रार जवळपास सर्वच कॉर्परेट कर्मचारी करताना दिसतात. पगारवाढीमध्ये फारसं काही हाती लागणार नाही याची कल्पना अनेकांना असते तरीही पगारवाढीकडून अपेक्षा असतेच. पण अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांना अक्षय सियानी नावाच्या नवउद्योजकाने एक सल्ला दिला आहे. नमस्तेदेव नावाचं शैक्षणिक अॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्टार्टअप सुरु करणाऱ्या अक्षय सियानी याने भारतीय कंपन्यांवर टीकास्र सोडलं आहे. 2 मे रोजी अक्षयने आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे.
पगारवाढीचा एकमेव मार्ग
"एक कटू सत्य सांगतो - पगारवाढ मिळवायची असेल तर नोकरी बदलत राहणं हा एकमेव मार्ग आहे," असं अक्षय म्हणाला आहे. पुढे बोलताना अक्षयने, "अनेक भारतीय कंपन्यांमध्ये दिली जाणारी पगारवाढ म्हणजे एखाद्या विनोदासारखी असते. एखाद्या सर्वसाधारण इंजिनिअरलाही क्वचितच टक्केवारीनुसार विचार केल्यास दोन आकडी पगारवाढ मिळते," असा दावाही अक्षयने केला आहे. "तुम्हाला तुमच्या कष्टापेक्षा कमी पगार मिळतोय असं वाटत असेल तर फार विचार करुन नका, नोकरी बदला," असा सल्लाही पोस्टच्या शेवटी अक्षयने दिला आहे. सध्या अक्षयची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
कमी पगारासाठी तुम्ही दोषी
अन्य एका पोस्टमध्ये अक्षयने, "कटू सत्य हेच आहे की तुम्ही कमी पगारावर करिअरची सुरुवात केली तर तुम्हाला सतत नोकरी बदलूनच अधिक पगार कमवता येईल. (किमान सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी हेच लागू होतं) त्यामुळेच तुम्ही अनेकदा भरपूर पगार असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सने अनेक जॉब बदलल्याचं पाहिलं असेल. त्यामुळे तुम्हालाही कमी पगार मिळतोय वाटत असेल, तुम्ही पगारवाढीसाठी, प्रमोशनसाठी प्रयत्न केले असतील आणि अपयश येत असेल तर नोकरी बदला. पगार हा उत्तम कामासाठी फार महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला तुमच्या कामापेक्षा कमी पगार मिळत असेल तर दोषी तुम्ही आहात हे लक्षात ठेवा. पण खरंच तुम्हाला कमी पगार असेल तरच नोकरी बदला. जास्त हाव ठेवू नका. जास्त हाव ठेवल्यास त्याचे वाईट परिणामही होतात," असं म्हटलं आहे.
"तुम्हाला तुमच्या कष्टापेक्षा कमी पगार मिळतोय असं वाटत असेल तर फार विचार करुन नका, नोकरी बदला," असा सल्लाही पोस्टच्या शेवटी अक्षयने दिला आहे. सध्या अक्षयची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
अक्षयच्या या पोस्टला 34 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.