मुंबई : कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे ब्रिटनने (Britain) भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर जाचक नियम लावले आहेत. आता भारताने ब्रिटनला जशास तसं उत्तर दिलं आहे. ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांसाठी (British Citizens) भारताने निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यावर 10 दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात (Quarantine) राहवं लागणार आहे. तसंच भारतात आल्यानंतर कोरोना चाचणीही करावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्यांसाठी हे नवीन नियम 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. हे निर्बंध सर्व ब्रिटिश नागरिकांना लागू होतील. या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी त्यांचा प्रवासाच्या 72 तास आधीचा कोविड-19 (Covid-19) आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट  (RTPCR TEST) अनिवार्य असणार आहे. तसंच भारतीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी आणि आठ दिवसांनंतर पून्हा चाचणी करावी लागणार आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटीश नागरिकांना त्यांच्या घरी किंवा जेथे ते भारतात येणार आहेत तेथे 10 दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहवं लागणार आहे.


ब्रिटनने केली सुरुवात


खरं तर याची सुरुवात ब्रिटटने केली आहे.  कोविडशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीयांसाठी 10 दिवसांच्या विलगीकरणाचा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियम शिथिल करावा अन्यथा तसंच उत्तर दिलं जाईल असा इशारा भारताकडून देण्यात आला होता. पण ब्रिटनने नियमात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे अखेर भारतानेही ब्रिटिश नागरिकांसाठी सक्तीचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले होते की, दोन्ही देशांचे सरकार ब्रिटिश सरकारने लागू केलेल्या प्रवासी नियमांविषयी चर्चा करत आहेत. ब्रिटन सरकारने 4 ऑक्टोबरपासून लागू केलेले नियम भेदभाव करणारे आहेत. आम्हालाही ब्रिटनला अशाच पद्धतीने प्रतिसाद देण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की दोन्ही देश चर्चेद्वारे समस्येवर तोडगा काढतील.