तामिळनाडू : प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न म्हणजे एक महत्वाची गोष्ट असते आणि त्यामुळे प्रत्येक जोडप्याला आपले लग्न सगळ्यांना आठवणीत रहावे अशा पद्धतीने करायचे असते. तामिळनाडूमधील एका हौशी जोडप्याने असाच एक वेगळा प्रयोग केला. ज्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा तर सर्वत्र झाली, परंतु त्यामुळे त्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. खरेतर कोरोनाची वाढती प्रकरणे पाहाता सोमवार, 24 मेपासून लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी मिळताच एका जोडप्याने रविवारी ज्या पद्धतीने लग्न केले हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या जोडप्याचा कोरोनाकाळात नियम न मोडता लग्न करण्याचा प्लॅन अखेर फसला आणि त्या जोडप्यावर आता कारवाई करण्यात येत आहे.


या जोडप्याने कोरोनाची काळजी म्हणून आकाशात उडत्या विमानात एअरलाईन्स 737 स्पाइसजेटमध्ये लग्नं पार पाडले आहे. यासंदर्भात एअरलाईन्स 737 स्पाइसजेटने विधान दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले की, या जोडप्याला चार्टर्ड विमानातील कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर डीजीसीएमार्फत फोटो आणि व्हिडीओग्राफीवरील निर्बंधाखाली काही प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात आला होता.


जोडप्याला आणि पाहुणे प्रवाशांना विमानतळ आणि विमान प्रवासा दरम्यान कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यासाठी लिखीत आणि तोंडी सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु वारंवार विनंती करूनही प्रवाशांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. त्याअंतर्गत स्पाइसजेटने त्या जोडप्यावर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


तमिळनाडूच्या राकेश आणि दीक्षाने कोरोनावरील निर्बंधामुळे आकाशात विमानामध्ये लग्न केले. चार्टर्ड प्लेनमध्ये दोघांनी मदुरै मीनाक्षी अम्मान मंदिराच्या वरुन उड्डाण केले, त्या दरम्यान या दोघांचे लग्न पार पडले.


चार्टर्ड प्लेनमध्ये झालेल्या या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. खरंतर तामिळनाडूमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आहे, अशा परिस्थितीत 50 हून अधिक लोकांना लग्न सोहळ्याला जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे राकेश आणि दीक्षाने आकाशात लग्न करण्याचा निर्णय घेतला.



या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली. बहुतेक सोशल मीडिया यूझर्सचे असे म्हणणे आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान देशाची तसेच तामिळनाडूची परिस्थिती वाईट असताना अशा भव्य कार्यक्रमाची आवश्यकता नव्हती.


पोलिस अधीक्षक सुजित कुमार यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत या प्रकरणावर निर्णय घेतलेला नाही. कारण त्यांना अजून हे स्पष्ट झालेले नाही की. हा गुन्हा शहरी हद्दीत  नोंदवायचा की ग्रामीण हद्दीत? ही एक विचित्र गोष्ट आहे, त्यामुळे कारवाई करण्यास थोडा वेळ लागू शकतो.