MP Crime News: 'सैराट' चित्रपटाचा (Sairat Film) शेवट पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. मुलीच्या कुटुंबाकडून जोडप्याची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्यानंतर पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा (Honor Killing) मुद्दा उपस्थित झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मृतदेहांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं होतं. पण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 'सैराट' चित्रपटात दाखवण्यात आली आहे त्यापेक्षाही भयानक घटना घडली आहे. 21 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सर्वात आधी दोघांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करण्यात आलं, नंतर त्यांचे मृतदेह मोठ्या दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकून देण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवानी तोमर आणि राधेश्याम तोमर यांची मुलीच्या कुटुंबीयांकडून हत्या करण्यात आली आहे. मोरेना जिल्ह्यातील गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी आणि राधेश्याम यांच्यात प्रेमसंबंध होते. शिवानीच्या कुटुंबीयांचा मात्र या नात्याला प्रचंड विरोध होता. राधेश्याम हा शेजारचं गाव बालुपूरा येथे राहत होता. 


राधेश्यामच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आपला मुलगा आणि त्याची प्रेयसी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून त्यांची गुप्तपणे हत्या झाली असावी असा आमचा संशय आहे असा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. पोलिसांना सुरुवातीला दोघेही पळून गेले असावेत असा संशय आला. पण गावातील कोणीही त्यांना पळून जाताना पाहिलं नसल्याने पोलिसांच्या तपासाने दुसरं वळण घेतलं. 


पोलिसांनी मुलीचे आई आणि वडील यांची चौकशी सुरु केली. त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तासनतास चौकशी केल्यानंतर अखेर त्यांनी गुन्हा कबूल केला. मुलीच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितलं की, 3 जूनला शिवानी आणि राधेश्याम यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नंतर त्यांचे मृतदेह दगडांना बांधून चंबल नदीत फेकून देण्यात आले. हा संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. 


"आम्ही मुलीच्या कुटुंबाची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांनी आम्हाला दोघांची हत्या केली असल्याचं सांगितलं. हत्य केल्यानंतर त्यांनी मृतदेह चंबल नदीत फेकून दिले होते. आम्ही मृतदेह परत मिळवण्यासाठी बचावपथकाची मदत घेतली आहे," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


चंबळ घरियाल अभयारण्यात 2000 पेक्षा जास्त मगरी आणि 500 ​​गोड्या पाण्यातील मगरी आहेत. त्यामुळे पोलिसांना मृतदेह मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.