भारतात आजपासून कोरोना लसीच्या सगळ्यात मोठ्या मानवी चाचणीला सुरुवात
भारतात कोव्हॅक्सिनची सगळ्यात मोठी मानवी चाचणी
नवी दिल्ली : एम्समध्ये आजपासून कोरोनाविरुद्धच्या लसीच्या सगळ्यात मोठ्या मानवी चाचणीला सुरुवात होणार आहे. या मानवी चाचणीसाठी नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचणीसाठी आयसीएमआरने दिल्लीतील एम्स आणि इतर १२ संस्थांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३७५ लोकांचं परीक्षण केलं जाणार आहे. यातले सर्वाधिक १०० जण एम्समधले असू शकतात. शनिवारी कोरोना व्हायरसविरुद्धची स्वदेशी लस असलेल्या कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली होती.
कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीबद्दल एम्सच्या सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. संजय राय म्हणाले, 'मानवी चाचणीसाठी निरोगी लोकांचा समावेश करण्यात येणार आहे. कोरोना झालेले नसलेले, तसंच १८ वर्ष ते ५५ वर्षांच्या नागरिकांचीच मानवी चाचणीसाठी निवड होईल. काही जणांनी या चाचणीसाठी आधीच नाव नोंदणी केली आहे. आता त्यांचं चेक अप केल्यानंतर त्यांना लस दिली जाईल.'
कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठी नाव नोंदवायचं असेल, तर याबाबत एम्सच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. याशिवाय 428847499 वर फोन करून किंवा एसएमएस करून, तसंच ctaiims.covid19@gmail.com वर मेल करूनही मानवी चाचणीसाठी सहभागी होता येईल.
कोव्हॅक्सिन या कोरोनाविरुद्धच्या लसीला हैदराबादमधील भारत बायोटेकने आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने एकत्र येऊन विकसित केलं आहे. भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार ३७५ स्वयंसेवकांवर मानवी चाचणी करण्यात येईल. ही चाचणी एकूण तीन टप्प्यांमध्ये घेतली जाईल.
एम्ससह भारतातल्या १२ संस्थांमध्ये ही मानवी चाचणी होणार आहे. एम्स पटनामध्ये १० स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात आली आहे. लस दिल्यानंतर या स्वयंसेवकांना कोणतेही साईड इफेक्ट्स झाले नाहीत. एम्स पटनानंतर पीजीआय हॉस्पिटल रोहतकमध्येही ३ स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन देण्यात आलं. या स्वयंसेवकांची तब्येतही व्यवस्थित आहे. आता दिल्लीच्या एम्समध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर या लसीची मानवी चाचणी होणार आहे.