नवी दिल्ली : कोरोना वायरसवर मात करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन पुढे वाढवला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने रविवारी १५ विविध उद्योग सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारतर्फे ट्रक, डागडुजी सेवा, फुटपाथ विक्रेत्यांना लॉकडाऊनपासून 'सुगम निकास रणनीती' अंतर्गत काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन एक्झिट प्लानच्या रुपात अनेक लहान-मोठ्या आस्थापनांना परवानगी देण्यात आली  आहे. असे असले तरी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. 


ज्या आस्थापनांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्यास सागण्यांत आले आहे. जर कर्मचारी तसे करत नसतील तर त्यांचा पगार कापण्याचा अधिकार संबंधित संस्थेकडे राहणार आहे. 



माहिती व जनसंपर्क विभागातर्फे डीटीएच आणि केबल ऑपरेर्सना आपल्या सेवा सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बातम्या, मनोरंजनाचे कार्यक्रम यात कोणताही व्यत्यय नको यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 


याआधी उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने अवजड इलेक्ट्रिकल्स आणि दुरसंचार उपकरण सुरु करण्याची परवानगी देण्याचा सल्ला गृह विभागाला दिला होता. यासंदर्भात गृह विभागाला पत्र लिहिण्यात आले. त्यानुसार देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी लोकांच्या हातामध्ये कॅश असणे गरजेचे असल्याचे यात म्हटले होते. जर सरकारतर्फे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय होत असेल तर सुरक्षात्मक उपाययोजनांसोबत अशा आस्थापनांना परवानगी द्यावी असे यात म्हटले होते.  


गृह विभागाने या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही. पण सोशल डिस्टंसिंग ठेवून वेगवेगळ्या राज्यातील महत्वाचे उद्योगधंदे कसे सुरु होतील यावर विचार सुरु आहे.


कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली


देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८,३५६वर पोहोचली आहे. मागच्या २४ तासामध्ये कोरोनामुळे ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०९ नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७१६ जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.


२९ मार्चला कोरोनाग्रस्तांची संख्या ९७९ एवढी होती, ती आता ८,३५६ पर्यंत पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना आयसीयू आणि व्हॅन्टिलेटरची गरज आहे. जवळपास १,०७६ रुग्णांना ऑक्सिजन व्हॅन्टिलेटर आणि आयसीयूची गरज पडेल, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.


आयसीयू व्हॅन्टिलेटर आणि दुसऱ्या वैद्यकीय उपकरणांवरून गोंधळ होऊ नये, म्हणून आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढताच रुग्णालयांची आणि बेडची संख्या वाढवली जात आहे.