Covid-19 Alert : भारतात तिसरी लाट आली? केवळ 2 दिवसात नवीन रुग्ण दुप्पट
भारतातील कोरोनाचे (Coronavirus in India) संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे आणि गेल्या 2 दिवसात नवीन रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
मुंबई : भारतातील कोरोनाचे (Coronavirus in India) संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे आणि गेल्या 2 दिवसात नवीन रुग्णांमध्ये 21 हजारांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड -19चे 46397 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर यापूर्वी मंगळवारी (24 ऑगस्ट) 25467 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले होते.
भारतात 3.4 लाख अॅक्टिव्ह केसेस
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये, देशभरात कोरोनाचे 46397 नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत, तर या काळात 608 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशात संक्रमित लोकांची संख्या 3 कोटी 25 लाख 57 हजार 767 वर गेली आहे आणि 4 लाख 36 हजार 396 लोकांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड -19 चे 34420 लोक बरे झाले आहेत, त्यानंतर बरे झालेल्यांची संख्या 3 कोटी 17 लाख 81 हजार 46 पर्यंत वाढली आहे आणि 3 लाख 40 हजार 325 लोकांवर उपचार सुरू आहेत.
नवीन रुग्ण दोन दिवसात जवळजवळ दुप्पट
गेल्या दोन दिवसांत, भारतात कोविड -19चे रुग्णांत वाढ झाली आहे आणि नवीन रुग्ण जवळजवळ दुप्पट झाली आहेत. भारतात, 24 ऑगस्ट रोजी देशभरात 25467 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत, जे आज (26 ऑगस्ट) आलेल्या आकडेवारीपेक्षा 20930 कमी आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोना विषाणूचे नवीन रुग्ण बुधवारी (25 ऑगस्ट) 37593पर्यंत वाढले होते आणि आज नवीन रुग्ण 46397 वर पोहोचले आहेत.
केरळमध्ये 67 टक्के रुग्णांची नोंद
केरळमध्ये संसर्गाच्या वाढत्या गतीमुळे कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली आहे आणि सर्वाधिक रुग्ण नोंदले गेले आहेत. केरळ आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (25 ऑगस्ट) संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 24 तासांमध्ये 31445 नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत. जे एकूण रुग्णांच्या 67 टक्के आहे. यापूर्वी मंगळवारी राज्यात 24296 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.
आतापर्यंत 59.55 कोटी लसीचे डोस घेतले
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 59 कोटी 55 लाख 4 हजार 593 डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत भारतात 46 कोटी 8 लाख 2 हजार 783 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 13 कोटी 47 लाख 1 हजार 810 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.