देशात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर, २४ तासात ३२ जणांचा मृत्यू
भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ४५०० च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत त्यानंतर दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. देशात गेल्या २४ तासात ७०४ नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेसारख्या देशात कोरोना बाधितांचा आकडा ४५ हजारांच्याही बराच पुढे गेलेला आहे. असं असतानाच आता भारतातही या विषाणूमुळे चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कोरोनामुळे देशात आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात साठ वर्षाहून अधिक वय असलेल्या वृध्दांच्या मृत्यूचा आकडा ६३ टक्के इतका आहे. देशातली कोरोनाबाधितांची संख्या पाहिली तर त्यात ४२ टक्के प्रमाण हे २१ ते ४० वर्षांच्या वयोगटाचं आहे. तर ४१ ते ६० वर्षांच्या व्यक्तींचं प्रमाण हे ३३ टक्के इतके आहे.
दरम्यान, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. आता खासदारांच्या पगारात कपात करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यपालांनी येत्या वर्षभरासाठी स्वतःच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यासाठी संमती दर्शवली आहे. याशिवाय प्रधानमंत्री, केंद्रसरकारचे सर्व मंत्री, सर्व खासदार यांच्या वेतनात येत्या वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला.
यासाठीचा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून आगामी अधिवेशनात यासंदर्भात कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक सादर केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. चालू महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यातून बचत होणारी रक्कम केंद्र सरकारच्या निधी मध्ये जमा केली जाणार आहे. याशिवाय चालू आणि आगामी आर्थिक वर्षासाठीचा सर्व खासदार निधीही केंद्रसरकारच्या निधीत जमा केला जाणार आहे. यातून सुमारे ७ हजार ९०० कोटींचा निधी जमा होणार आहे.