नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असणारं लॉकडाऊन पाहता आता या परिस्थितीतून साऱ्या देशाला बऱ्याच आशा आहेत. अशी माहिती सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार जवळपास १८ राज्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं दुपटीने वाढणारं प्रमाण घटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा वेग दुपटीने वाढण्याचा हा दर ३.४ दिवसांऐवजी आता ७.५ दिवसांवर पोहोचला आहे. इतकंच नव्हे, तर जवळपास २३ राज्यांमधील ५९ जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. सध्याच्या घडीला देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा १७२६५ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये मागील २४ तासांमध्ये १५५३ नवे रुग आढळून आले आहेत. तर, ३६ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. 


देशातील चार राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी म्हणून केंद्राकडून सहा समिती स्थापण्यात आल्या आहेत. ज्या अपेक्षित स्थळी म्हणजेच कोरोना प्रभावित क्षेत्रांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढवा घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यामध्ये सध्याच्या घडीला कोणीही कोरोनाबाधित रुग्ण नाही. सोबतच माहे, (पुद्दुचेरी), कोडागू (कर्नाटक), पौडी गढवाल  (उत्तराखंड) या ठिकाणी मागील २८ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती, अग्रवाल यांनी दिली. 



 


दरम्यान, लॉकडाऊनच्या निर्देशांचं पालन न करणाऱ्यांवर सक्तीचीकारवाई होऊ शकते असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोणतंही राज्य केंद्राकडून आखून दिलेल्या निर्देशांना शिथिल करु शकत नाही, असाच सूर यावेळी अधिकाऱ्यांनी आळवला. केरळसमवेत इतर सर्वत राज्यांकडून लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन केलं जावं यासाठी आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय यावेळी आग्रही दिसून आलं.