मुंबई : कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, असे असताना कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे. देशात आता कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्यावर पोहोचला आहे. कोरोनाचा फैलावर रोखण्यात अपयश येत असल्यामुळे  लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. असे असताना सोमवारी रात्री १० वाजेनंतर कोरोना बाधितांचा आकडा हा जवळपास १ लाख ३२८ च्या घरात पोहोचला आहे. ३९,२३३ जण बरे झाले आहेत तर ३१५६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वर्ल्डमीटरने दिली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होण्याआधीच महाराष्ट्र, पंजाब या राज्यांनी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला होता. केंद्र सरकारने रविवारी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावलीही जाहीर केली. यानंतर सोमवारी उत्तर प्रदेश आणि तेलंगणाने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे देशात आता ३१ मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. 


जगात भारत अकाव्या स्थानावर तर चीन १३ व्या स्थानावर


कोरोनाचा फैलाव कायम असल्याने जागातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ५० लाखांजवळ पोहोचली आहे. यापैकी ३,२०,१३० जणांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे अमेरिकेत आहेत. त्यानंतर रशियाचा क्रमांक लागतो. अमेरिकेत १५ लाखांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियात २ लाख ९० हजार ६७८ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी २७२२ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असले तरी इतर देशांच्या तुलनेत तेथील मृत्यूदर हा अतिशय कमी आहे. 



तसेच तिसऱ्या क्रमांकावर स्पेन असून तेथे २७८२८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  ब्रिटन चौथ्या क्रमांकावर असून २५५३६८ लोकांना बाधा झाली असून १६,८५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाचव्या क्रमांकावर ब्राझील, सहाव्या क्रमांकावर इटली, फ्रान्स सातव्या क्रमांकावर, जर्मनी आठव्या, तुर्की नवव्या तर इराण दहाव्या क्रमांकावर आहे. तर भारत अकराव्या क्रमांकावर आहे. मात्र, ज्या देशातून याचा प्रसार झाला तो चीन मात्र, १३ व्या क्रमांकावर असून ८२,९६० रुग्ण आहेत. यात ६ नव्या केस दाखल झाल्या आहेत. ४६३४ लोकांचा मृत्यू झाला आहे.