देशात २४ तासांत १३३४ नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ हजारांवर
आतापर्यंत 2231 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना व्हायरस रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 1334 कोरोनाचे नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून ती 15 हजार 712वर पोहचली आहे.
देशात आतापर्यंत 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 2231 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
- गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1334 रुग्ण वाढले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 तासांत 239 रुग्ण बरे झाले आहेत.
- देशात आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. भारतात 197 सरकारी लॅब आणि 82 खासगी लॅबमध्ये कोरोना चाचण्यांच काम सुरु आहे.
- दिल्लीतील जहांगीरपुरी येथे एकाच घरातील 31 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ माजली आहे. हे सर्व लोक कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कात आले होते. प्रशासनाकडून हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
- महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 3648 झाली आहे. शनिवारी राज्यात 328 नवे रुग्ण आढळले. तर 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 211 झाली आहे. तर आतापर्यंत 365 रुग्ण बरे झाले आहेत.
- गोवा राज्य ग्रीन झोन घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या 2 आठवड्यामध्ये गोव्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. गोव्यात 7 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत.
- जगात कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 लाखांवर पोहचला आहे. तर कोरोनामुळे जवळपास 1 लाख 59 लोकांचा बळी गेला आहे. जगभरात 5 लाख 90 हजारहून अधिक लोक बरे झाले आहेत.
- सर्वाधित कोरोनाबाधित अमेरिकेत आढळले आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 26 हजारांवर पोहचली आहे.