नवी दिल्ली :  दिल्ली सरकारने आता शहरातील सर्वच घाऊक बाजारांमध्ये सम-विषम हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाअंतर्गत विक्रेते एक दिवस वगळता बाजारात भाज्या विकू शकतील. दिल्ली सरकारचे विकास मंत्री गोपाल राय म्हणाले की, सरकारने घाऊक बाजारात भाज्या आणि फळ विक्री करण्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारकडून याकाळात महत्त्वाचे  निर्णय घेण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास मंत्री गोपाल राय यांच्या सांगण्यानुसार, 'घाऊक बाजारांमध्ये भाज्या सकाळी ६ ते ११ वाजे पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असतील, तर फळांची विक्री दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येईल.' विकास मंत्री गोपाल राययांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 


राष्ट्रीय राजधानी दिल्लीत भाज्या आणि फळांसाठी आजादपूर बाजार, गाजीपूर बाजार, ओखला बाजार, नजफगढ बाजार आणि नरेला बाजार हे मोठे बाजार आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाज्या आणि फळं खरेदी करण्यासाठी  ग्राहकांची एकच गर्दी जमलेली असते.


राय यांच्या सांगण्यानुसार, ज्याठिकाणी असंख्य व्यापारी भाज्या आणि फळं विकण्यासाठी बसतात त्या सर्वांना त्यांच्या क्रमांकाच्या आधारावर काम करण्याची  परवानगी देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता आणि सोशल डिस्टंसिंगचं महत्त्व लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.