Corona Fourth Wave | चीन, हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ, भारताला चौथ्या लाटेचं संकट?
चीन आणि हाँककाँगमधून येत असलेल्या बातम्या या देशाला हादरवणाऱ्या आहेत. कारण शाघायपाठोपाठ आता हाँगकाँगमध्येही कोरोनानं थैमान घातलंय.
मुंबई : भारतात सध्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल झालेत. त्यामुळे लोकही निश्चिंत झाले असून नियमही पाळदळी तुडवले जात आहेत. मात्र चीन आणि हाँककाँगमधून येत असलेल्या बातम्या या देशाला हादरवणाऱ्या आहेत. कारण शाघायपाठोपाठ आता हाँगकाँगमध्येही कोरोनानं थैमान घातलंय. (covid 19 rising in china and hong kong know what telling excepert abpout fourth wave in india)
भारतातवरही चौथ्या लाटेचं संकट
कोविडसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी असलेल्या चीनमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या दररोज झपाट्यानं वाढतेय. ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BA.2 मुळे चीनमधली स्थिती स्फोटक बनली आहे. हाँगकाँगमध्ये दररोजची विक्रमी रुग्णवाढ दिसतेय. तसंच मृत्यूचं प्रमाणही अधिक असल्याचं सांगितलं जातंय.
चीनमधल्या स्थितीचा भारतावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र केंद्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र कुमार यांनी ही शक्यता कमी असल्याचं म्हटलंय.
भारतात तिस-या लाटेमध्ये 75 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनच्या BA.2 व्हेरियंटचे होते. त्यामुळे चीनमधल्या व्हेरियंटचा भारतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं डॉक्टर कुमार यांनी म्हटलंय.
मात्र IIT कानपूरमधील (IIT Kanpur) तज्ज्ञांनी भारतात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ शकते, असा अंदाज वर्तवलाय. चीनमधल्या ताज्या लाटेनंतर भारतातील स्थितीबाबत विविध अंदाज वर्तवले जातायत. त्यामुळे आपल्याला बेसावध राहून चालणार नाहीये.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन व्हायला हवं. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा उपयोग करायला हवा. सॅनिटायझर, सातत्यानं हात धुवायला हवेत. कोरोनाचं लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरण न झालेल्यांनी लस घ्यावी. ज्येष्ठांनी बुस्टर डोस घ्यायला हवा. त्यामुळे सध्या केसेसे कमी असल्या तरी कोरोनाला हलक्यात घेऊ नका. सतर्क राहा, काळजी घ्या आणि कोरोनाला हरवा.