Covid-19 Update: भारतात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येतेय. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता अधिक वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी गेल्या 24 तासांमध्ये 160 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या 1886 पर्यंत पोहोचली आहे. तर 2 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक आणि केरळमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि थंडीच्या स्थितीमुळे 5 डिसेंबर 2023 नंतर संसर्गाची प्रकरणं वाढलीयेत. 31 डिसेंबर 2023 रोजी एकाच दिवसात कोरोनाची 841 नवीन प्रकरणं नोंदवली गेली होती. 


90 टक्क्यांहून अधिक रूग्ण आयसोलेशनमधून झाले बरे


यावेळी उपचार घेत असलेल्या एकूण रूग्णांपैकी सुमारे 92 टक्के रूग्ण आयसोलेशनमध्ये बरे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या आकडेवारीवरून असं पहायला मिळतंय की, व्हायरसच्या JN.1 प्रकारामुळे नवीन प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत नाहीये. याशिवाय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या किंवा मृत्यूदरही वाढला नाही. 


भारताने यापूर्वी कोरोनाच्या तीन लाटांचा सामना केला आहे. एप्रिल-जून 2021 दरम्यान डेल्टा या व्हेरिएंटचा सामना केला असून त्यावेळी दररोज नवीन प्रकरणे आणि मृत्यूंची संख्या खूप जास्त होती. 7 मे 2021 रोजी कोविड-19 ची सर्वाधिक 4,14,188 नवीन प्रकरणे आणि 3,915 मृत्यूची नोंद झाली.


आतापर्यंत 4.5 कोटी लोकांना कोरोनाची लागण


यावेळी कोरोनाची लागण देशात एकूण 4.5 कोटींहून अधिक लोकांना झाल्याचं समोर आलं आहे. संसर्गामुळे देशभरात 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे. यावेळी रिकव्हरी रेट 98.81 टक्के आहे.