मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेचा आज आढावा घेतला. देशात लसीकरण धिम्या गतीनं सुरू असल्यानं पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी कोरोना वॉरियर्सना संबोधित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरणाला गती देण्यासाठी लोकांना जागरुक करणं आवश्यक आहे, कोरोन वॉरियर्सना यासाठी प्रचार करावा लागेल, असं पंतप्रधांनांनी यावेळी म्हटलं. पंतप्रधान पुढे म्हणाले की या कामात स्थानिक धार्मिक नेत्यांचीही मदत घेऊ शकता आणि त्यांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संदेश देऊ शकता. पीएम मोदी म्हणाले की, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी लोकांना लसीकरण केंद्रात नेण्याची आणि तेथे सुरक्षित लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. आता प्रत्येक घरात लस, घरोघरी लस, या भावनेने तुम्हाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे आहे.


प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावताना पहिल्या डोससोबतच दुसऱ्या डोसकडेही तुम्हा सर्वांना लक्ष द्यावं लागणार आहे. कारण जेव्हा संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागतो तेव्हा लोक निष्काळजी होतात. देशात 100 कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकतं, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.


100 वर्षांतील या सर्वात मोठ्या महामारीच्या काळात देशाने अनेक आव्हानांचा सामना केला आहे. कोरोनाशी लढताना एक खास गोष्ट म्हणजे आम्ही नवीन उपाय शोधले आणि नवीन मार्गांचा अवलंब केला. तुम्हालाही तुमच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी नवीन मार्गांवर अधिक काम करावे लागेल, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.


तुम्हाला प्रत्येक गावासाठी, तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक शहरासाठी वेगवेगळी रणनीती बनवावी लागली तर तीही बनवा. तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार 20-25 लोकांची टीम बनवून देखील प्रचाराचं काम करू शकता. पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येकाला लस, मोफत लस मोहिमेअंतर्गत आपण एका दिवसात सुमारे 2.5 कोटी लसीचे डोस देण्याचा विक्रम केला आहे. यातूनच आपलं सामर्थ्य दिसून येतं. 


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत भारतात 107 कोटीहून अधिक करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.