मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आणि मृतांचा आकडा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊचा कालावधी वाढवला आहे. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत.  कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना टेलिमेडिसीनद्वारे कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची माहिती व डॉक्टरांचा सल्ला मिळणं आता सहज शक्य होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासन व इतर संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ' कोवीड - मदत' या टेलि मेडिसीन हेल्पलाईनवरील 09513615550 क्रमांकावर ही सेवा उपलब्ध होणार आहे. या रोगाच्या साथीचा प्रसार होत असल्यामुळे झालेल्या परिस्थितीमुळे रुग्णालयांवर ताण पडत आहे. अनेक सामान्य नागरिकांना कोवीडची लक्षणे असल्याचा संशय येत असतो. त्यांची शंका दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी 'कोवीड मदत' ही टेलिमेडिसीन हेल्पलाईन सुरू केली आहे. 


त्यासाठी नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर), ‘टेलीमेड्स Vs कोविड’ ग्रुप आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांनी एकत्र येऊन ‘कोविड-मदत’ ही टेलिमेडिसीन सेवा सुरू केली आहे. 


तसेच कोवीडची लागण झाली असल्यास त्यांची माहिती आरोग्य विभागाकडे जाते व तेथून कोरोना बाधित व्यक्तिवर तातडीने उपचार सुरू करण्याची कारवाई करण्यात येते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या व इतर आजार असलेल्या नागरिकांनाही या आरोग्य यंत्रणेमार्फत योग्य ती वैद्यकीय मदत केली जाते.


कोवीड मदत हेल्पलाईनवर सेवेसाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदणी करावी


'कोवीड मदत' या हेल्पलाईनवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. राज्यातील नागरिकांना या हेल्पलाईनच्या माध्यमातून योग्य तो सल्ला देण्यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टरांनी bit.ly/covidmadat या संकेतस्थळावर नोंदणी करावी. कोवीड विरुद्धच्या या लढ्यात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.