Anjun Khan vs Nazia Elahi : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेची (Shivam Dube)  पत्नी अंजुम खान  (Anjum Khan) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अंजुम खान आणि भाजप नेत्या नाजिया इलाही (Nazia Elahi) यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. अंजुम खानने भाजप नेत्या नाजिआ इलाही यांच्या अटकेची मागणी केली आहे. नाजिया इलाही खान या भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या सदस्य आहेत. हा वाद सुरु झाला तो अंजुम खानच्या इन्स्टाग्राम स्टोरीने. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अंजुम खानने नाजिया खान यांच्या अटकेची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजुम खानची इन्स्टाग्राम पोस्ट
शिवम दुबेची पत्नी अंजुम खानने इन्स्टा स्टोरीत लिहिलंय 'पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांवर तुम्हाला राग येत नसेल तर तुमचा प्रामाणिकपणा मेला आहे, जर तुमचा प्रामाणिकपणा  जिवंत असेल तर माझ्या बरोबर लिहा #ArrestNaziaElahiKhan" अंजुम खानने पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 'सर्व मित्रांना विनंती आहे की आता या नाजिया खानची दखल घेण्याची वेळ आली आहे. मुस्लिमांच्या विरोधात बोलत असतानाच आता ती आमच्या गुरु पैगंबराविरुद्धही बोलू लागली आहे' मात्र, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अंजुम खानने ती डिलीट केली.


नाजिया खानचं प्रत्युत्तर
अंजुम खानच्या इन्स्टाग्राम पोस्टला भाजप नेत्या नाजिया इलाही यांनीही उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिलंय, मॅडम तुम्ही आता एका हिंदूबरोबर लग्न केलं आहे, इस्लामनुसार तुम्ही आता मुस्लिम नाही. तुझा विवाह इस्लामनुसार मान्य नाही, मी हे घटनात्मक न्यायालय आणि शरिया न्यायालयात सिद्ध करेन. पण तुमच्या पत्नीने माझ्या विरोधात जो प्रक्षोभक, द्वेषपूर्ण  मजकूर पोस्ट केला आहे तो आता तिला  सिद्ध करावे लागेल, मी नोटीस पाठवली आहे, माझी हिंमत तेव्हाच कळेल जेव्हा तुमची पत्नी न्यायालयात येऊन उत्तर देईल.



अंजुम खानच्या इन्स्ट पोस्टचे सोशल मीडियावर चांगलेच पडसाद उमटले आहेत. अंजुम खान यांची पोस्ट म्हणजे नाजिया इलाही खान यांच्या विरोधात हिंसा करण्यासाठी प्रवृत्त केली जाणारी असल्याचं युजर्सने म्हटलं आहे. अनेकांनी या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. 


कोण आहे अंजुम खान?
शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एका टीव्ही मालिकेत अंजुम खानने अभिनय केला आहे. याशिवाय तीने एका म्युझिस अल्बममध्येही काम केलं आहे. शिवम आणि अंजुमचं लग्न आधी हिंदू पद्धतीने आणि नंतर मुस्लिम पद्धतीने झालं. अंजुम खान ही मुळची उत्तर प्रदेशमधली राहाणारी असून तीने आपलं शिक्षण अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीतून पूर्ण केलं. शिवम आणि अंजुमने लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं.