`या` माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप
पोलिसांकडून गुन्हा दाखल
तिरुअनंतपुरम: सध्या देशभरात #MeToo चळवळ गाजत असताना आता केरळमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांनी आपले अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. याविरोधात केरळ पोलिसांनी शनिवारी रात्री ओमान चंडी यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला.
'द हिंदू'च्या माहितीनुसार, केरळमधील सौरउर्जा घोटाळ्याशी याप्रकरणाचा संबंध आहे. या घोटाळ्यातील आरोपी महिलेला २०१३ मध्ये ओमान चंडी यांनी सरकारी निवासस्थानी बोलवून घेतले. तेथे आल्यानंतर ओमान चंडी यांनी या महिलेला तिच्या उद्योगाला अभय देईन, असे सांगितले. त्या मोबदल्यात चंडी यांनी तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. यानंतर चंडी यांनी आपले अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक शोषण केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
याविरोधात महिलेने केरळ गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे आता ओमान चंडी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.