West Bengal Rape Case: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद परिसरातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधमानी विकृतीचा कळस गाठला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर तिचे स्तन कापले, डोळे काढून फेकून दिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला पुरण्यात आले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना मुर्शिदाबादच्या हरिहरपारा येथील आहे. येथे 13 वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर 27 जानेवारी रोजी गावातील शेतात तिचा मृतदेह आढळला होता. मात्र, मृतदेहाची अवस्था पाहून गावकरीदेखील हादरले होते. 


मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीचे दोन्ही स्तन कापण्यात आले होते. डोळेदेखील काढण्यात आले होते. शरीरावर दाताचे व्रण उठले होते. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांच्या आरोपांनंतरही पंचनामा न करता मृतदेह पुरण्यात आला. 


कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, आम्ही पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांनी आमचं काहीएक ऐकून न घेता तिला दफन केले. त्यानंतर कुटुंबीयांनी थेट कोर्टाचे दार ठोठावले आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर कोर्टाने आदेश देत मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यास सांगितला. मुलीच्या मृत्यूनंतर तब्बल 20 दिवसांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला. 


पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला मृतदेह


मुलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी एसएसकेएम रुग्णालयात कोलकत्ता येथे पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तर, परिसरातही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी पीडीत तरुणी घरातून बेप्पता झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. संपूर्ण परिसर पिंजून काढला तरी त्यांना पीडित तरुणी सापडली नाही. मात्र तिच्या खोलीत कुटुंबीयांना एक चिठ्ठी सापडली. त्यात काळजी करु नका, असं लिहलं होतं. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला. 


पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी गावातीच एका तरुणावर तिचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. लग्नाचे वचन देत त्यानेच तिचे अपहरण केले, असा आरोप त्यांनी केला आहे. तरुणानेच तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची निर्घृण हत्या केली. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.