Crime News: आईने प्रियकराच्या मदतीने 3 वर्षांच्या मुलीचा केली हत्या; धावत्या ट्रेनमधून फेकला मृतदेह
Rajasthan Crime News: पोलिसांना रेल्वे रुळांच्या बाजूला एका लहान मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. या मुलीच्या आईला शोधून काढल्यानंतर सुरु झालेल्या तपासात धक्कादायक घटनाक्रम आला समोर.
राजस्थानमधील गंगानगर शहरामध्ये पोलिसांनी एका विवाहित महिलेसहीत तिच्या प्रियकराला स्वत:च्याच मुलीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या तीन वर्षीय मुलीचा हत्या करुन मृतदेह धावत्या ट्रेनमधून खाली फेकल्याचा आरोप आहे. पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी हिंदुमलकोट पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रेल्वे रुळावर आढळून आला. त्यानंतर या मुलीची ओळख पटल्यावर पोलिसांनी तिची आई सुनिता हिला शोधून काढलं. मुलीच्या हत्येसंदर्भात चौकशीदरम्यान सुनिताने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुनिताने मृतदेहाची विल्हेवाट लावताना केलेल्या एका चुकीमुळे पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले.
पाच मुलांची आई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच मुलांची आई असलेल्या सुनिताने तिचा प्रियकर सन्नी उर्फ मालताच्या मदतीने शास्त्रीनगर परिसरात राहत होती. सुनिताची तीन मुलं तिच्या पतीबरोबर राहत होती. तर चार वर्षांच्या दोन मुली सुनिताबरोबर राहायच्या. यापैकी मोठी मुलगी चार आहे तर हत्या झालेली छोटी तीन वर्षांची होती.
गळा दाबून केली हत्या
16 ते 17 जानेवारीच्या रात्री सुनिताने तीन वर्षांच्या किरणची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर सुनिताने सन्नीच्या मदतीने मुलीचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळला आणि त्याच रात्री ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी गंगानगर रेल्वे स्थानक गाठलं.
नदीत मृतदेह फेकायचा होता पण...
गंगानगर पोलीस स्थानकातील अधीक्षक आनंद शर्मा यांनी या घटनाक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. "महिला आणि तिचा प्रियकर सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन पकडली. सकाळी 6.45 ते 7 वाजण्याच्या सुमारास फतूही रेल्वे स्टेशनच्या आधी ट्रेन नदीवरील पुलावर पोहचली असता तिने मुलीचा मृतदेह ट्रेनमधून फेकून दिला. तिला मृतदेह नदीमध्ये फेकायचा होता. मात्र मृतदेह रुळाजवळ पडला," असं शर्मा यांनी सांगितलं. सुनिताचा अंदाज चुकल्याने मृतदेह नदीऐवजी रेल्वे रुळाच्या बाजूला पडला आणि तो पोलिसांना सापडला. याच एका गोष्टीमुळे पोलीस सुनिता आणि तिच्या प्रियकरापर्यंत पोहचले.
पुन्हा घरी आले
मुलीचा मृतदेह फेकून दिल्यानंतर दोघेही अबोहर रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांनी पुन्हा गंगानगरकडे जाणारी ट्रेन पकडून घर गाठलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन्ही आरोपींना मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवाशी असलेल्या सुनिका आणि सन्नीला अटक केली आहे.