फिरोजाबाद : नवविवाहित जोडप्यांसाठी लग्न हा त्यांच्या आयुष्यातील मोठा दिवस असतो. लग्ना नंतर हे जोडपं आपल्या आयुष्याची नवीन सुरवात करतात. परंतु या नवविवाहित महिलेनं असं काही केलं की, तिला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जेलमध्ये जावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक नवविवाहित महिला आपल्या प्रियकराच्या प्रेमात अशी वेडी होती की, तिला काय चुक आणि काय बरोबर यातील फरतच समजत नव्हता.


कारण ही महिला तिच्या लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच प्रियकरासह पळून गेली. त्यानंतर जेव्हा तिच्या सासरच्यांनी पोलिसात तक्रार केली तेव्हा या महिलेला अटक करण्यात आली. परंतु गुरुवारी तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता, या महिलेने एका महिला हवालदाराला धक्का देऊन पोलिस कोठडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी तिला अटक केली आहे आणि तिला तुरूंगात पाठवले आहे.


ही वधू फिरोजाबादच्या पोलिस स्टेशनच्या दक्षिण भागातील हुमायूंपुरची रहिवासी आहे. 20 जून रोजी या मुलीचे लग्न उत्तर कोतवाली परिसरातील रहिवासी सोनूशी झाले होते. लग्नानंतर दुसर्‍या दिवशी 21 जून रोजी ही महिला तिचा प्रियकर मनोज सोबत पळून गेली.


परंतु पळून जाताना तिने घरातील सासूचे दागिनेही चोरुन घेतले होते. त्यामुळे सासरच्यांनी सुनेच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले.


मेडिकलसाठी पोलिसांनी रुग्णालयात आणले


पोलिसांनी महिलेला अटक करुन तुरूंगात पाठवण्याची तयारी केली होती. परंतु त्याआधी तिला मेडिकल तपासासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी या महिलेने संधीचा फायदा घेत, महिला पोलिस हवालदाराला धक्का मारुन पळून गेली.


महिला पोलिस हवालदाराने आरडा ओरडा केल्यामुळे रुग्णालयातील उपस्थित काही लोकांनी या नवविवाहित महिलेचा पाठलाग केला आणि तिला जैन नगर भागातून पकडले. त्यानंतर तिला पोलिसांच्या स्वाधीन केले गेले. सध्या पोलिस पुढील तपास करत आहेत परंतु या महिलेने अद्याप काहीही पोलिसांना काहीही सांगितले नाही.