Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती. राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमावाने मोदी-मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले. त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममध्ये रविवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचा आणि भाजपचे बॅनर जबरदस्तीने लावण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्याचवेळी राहुल गांधींसोबत देखील बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली. भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या बसमधून खाली उतरले. केसेबसे राहुल यांना गर्दीतून वाचवून 'भारत जोडो न्याय यात्रा' बसमध्ये आणण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी खिडकीपाशी बसले होते आणि बाहेर जमाव जय श्री राम आणि मोदी-मोदींच्या घोषणा देत होता. यावेळी राहुल गांधी त्यांना फ्लाइंग किस देत राहिले. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.


भाजपची टीका


लोकांनी जय श्री राम आणि मोदी-मोदीच्या घोषणा दिल्याने राहुल गांधींचा संयम सुटला. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा भाग होण्याचे हिंदुद्वेषी काँग्रेसला दिलेले निमंत्रण त्यांनी नाकारल्यानंतर ते इतके नाराज असतील तर येत्या काळात ते या देशातील जनतेला कसे सामोरे जातील?, असा सवाल भाजपने केला आहे.


नेमकं काय घडलं?


राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक त्यांच्या हातात भाजपचे झेंडे घेऊन रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहेत. राहुल गांधींची बस त्या लोकांपर्यंत पोहोचताच तिथे उभ्या असलेल्या लोकांनी जय श्री राम आणि मोदी मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर बस चालकाने गाडी हळू चालवण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी चालकाला बस थांबवण्यास सांगितले. बस थांबताच राहुल गांधी बसमधून बाहेर आले आणि गर्दीत शिरू लागले, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा बसमध्ये बसवले.



दरम्यान, संध्याकाळी उशिरा नागावच्या अंबागन भागात लोकांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जमावाने 'राहुल गांधी गो बॅक'च्या घोषणा दिल्या. भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी एका दुकानात दिसत आहेत, दुकानाबाहेर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. लोक त्यांच्या विरोधात घोषणा देत होते. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथून दूर नेले. आंदोलकांच्या हातात पोस्टर आणि बॅनर होते.


राहुल गांधी काय म्हणाले?


"आज भाजपचे काही कार्यकर्ते झेंडा घेऊन आमच्या बससमोर आले. मी बसमधून उतरलो आणि ते पळून गेले. तुम्हाला पाहिजे तितकी आमची पोस्टर्स फाडून टाका आम्हाला पर्वा नाही. हा आमच्या विचारधारेचा लढा आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही. ना नरेंद्र मोदींना, ना आसामच्या मुख्यमंत्र्यांना," असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.