Goa Vande Bharat Train: कोकण व गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेवर एक नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक पुन्हा लागू करण्यात येत आहे. त्यामुळं सीएसएमटी-मडगाव वंदे भारतची सफर प्रवाशांना दररोज शुक्रवारवगळता दररोज घडणार आहे. तर, राजधानीसह 88 गाड्यांचा वेग वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सून माघारी गेल्यानंतर आता 1 नोव्हेंबरपासून गैर-पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. मुंबई-गोवा रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. मात्र, एक नोव्हेंबरपासून वंदे भारत आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. तर, शुक्रवारी देखभाल व दुरुस्तीसाठी वंदे भारत बंद असेल. 


दिवाळी आता अगदी काही दिवसांवर आली आहे. तर, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोक गोव्याला जातात. न्यू इअरला लक्झरी बसेस आणि विमानाच्या तिकिटांत मोठी वाढ होते. अशावेळी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांसाठी चांगला पर्याय ठरणार आहे. 


गोवा- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 8 कोच आहेत. तर, ही ट्रेन 11 स्थानकांवर थांबते. मुंबई-गोवा हे 586 किमीचे अंतर पार करण्यासाठी 7 तास 50 मिनिटांचा वेळ लागतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम, मडगाव या स्थानकात ट्रेनला थांबा असणार आहे. मुंबई - गोवा वंदे भारत ट्रेनचं तिकीट १९७० रुपये आणि ईसी अर्थात एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचं तिकीट ३५३५ रुपये आहे. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान आयआरसीटीसीकडून खाण्याचीही सुविधा आहे. वंदे भारतने मुंबई - गोव्यासाठी ७ तास ५० मिनिटांचा कालावधी लागेल. पण वंदे भारतच्या तिकिट दरात बदल होऊ शकतो.


एक्स्प्रेसचाही वेग वाढणार


पावसाळात कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असतो. अशातच रेल्वेवर दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळं पावसाळ्यात कोकण मार्गावरील एक्स्प्रेसची वेगमर्यादा ही 75 किमी अशी असते. तर, पावसाळ्याचा सिझन संपल्यानंतर ठराविक वेगमर्यादा नसते. त्यामुळं कमाल वेगाच्या नियमानुसारच मेल-एक्स्प्रेस धावतात. मुंबई गोवा मार्गावर काही भागांसाठी रेल्वेगाड्यांना १०० ते १२० ताशी किमी या वेगाची मंजुरी आहे. आता 1 नोव्हेंबरपासून जनशताब्दी, तेजस, दुरांतो, मत्स्यगंधा, हमसफर, मांडवी, मरूसागर, कोकणकन्या, तुतारी, गोवा संपर्क क्रांती या गाड्यांचा वेग वाढणार आहे.