`काका, कितीची साडी दाखवू?` ऐकताच ग्राहक संतापला! 10-15 मित्रांना घेऊन आला अन्...; पाहा CCTV
Customer Beats Shopkeeper Viral Video: सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मात्र नक्की या साडीच्या दुकानामध्ये घडलं काय जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम आणि हा वाद कसा सुरु झाला हे ही समजून घ्या
Customer Beats Shopkeeper Viral Video: महिलेला तिचं वय आणि पुरुषांना त्यांचा पगार विचारु नये असं म्हणतात. खरोखरच अनेकदा महिलांना राग येतो. अनेकदा त्या तसं थेट बोलूनही दाखवतात. मात्र वयाच्या संदर्भातून अनेकदा पुरुषांनाही काका, मामा म्हटलेलं आवडत नाही. अशाच एका विचित्र वादातून एका दुकानदाराला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
कुठे घडला हा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील दुकानदाराबरोबर हा विचित्र प्रकार घडला आहे. एका ग्राहकाला साड्या दाखवण्यासंदर्भात विचारणा करताना दुकानदाराने या ग्राहकाचा उल्लेख 'काका' असा केला. त्यामुळे संतापलेल्या या ग्राहकाने साड्यांच्या दुकानात राडा घातला. जातखेडी परिसरामधील दुकानात हा प्रकार घडला. या दुकानदाराने 'काका' अशी हाक मारल्याने या ग्राहकाने काही मित्रांना गोळा करुन दुकानदाराला मारहाण केली.
ग्राहक 30 वर्षांचा उल्लेख केला 'अंकलजी'
ज्या दुकानामध्ये हा प्रकार घडला त्याचं नाव शास्त्री फॅशन असं असून मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव विशाल शास्री असं आहे. विशाल शास्त्री हे या दुकानाचे मालक आहे. ज्या व्यक्तीने दुकानदाराला मारहाण केली तो 29 ते 30 वर्षांचा आहे. तो त्याच्या कुटुंबियांबरोबर साड्यांची खरेदी करण्यासाठी दुकानात आला होता. मारहाण झालेल्या विशाल शास्त्रींनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्राहकाने दुकानामध्ये आल्यानंतर एक हजार रुपयांपर्यंतची साडी दाखवा असं सांगितलं. या साड्या दाखवत असतानाच विशाल यांनी या ग्राहकाचा उल्लेख 'अंकलजी' असा केला. 'अंकल जी, कितने की साड़ी दिखा दू,' असं विशाल यांनी या ग्राहकाला विचारलं होतं. काका असा उल्लेख केल्यामुळे या ग्राहकाला राग आला. त्याने यावरुन विशालबरोबर वाद घातला.
पोलिसांकडून शोध सुरु
विशालला मारहाण करणाऱ्या ग्राहकाचा तसेच त्याच्या मित्रांचा तपशील पोलिसांनी उघड केलेला नाही. विशालने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारा मिसदोर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची सीसीटीव्ही आणि इतर माध्यमांमधून तपास करत आहेत. विशलला मारहाण करणारा ग्राहक आणि त्याचे ते 10 ते 15 मित्र कोण आहेत हे पोलीस शोधत आहेत.