Cyber Crime Man Duped Rs 9 Lakh: इंटरनेटचा वापर वाढलाय त्याच प्रमाणामध्ये सायबर गुन्ह्यांची संख्याही (Cyber Crime) वाढल्याचं चित्र मागील काही वर्षांपासून दिसत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांना सायबर सुरक्षेबद्दल कल्पना असते ते यामधून वाचतात मात्र आजही बहुतांशी लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहज अडकतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. येथील एका व्यक्तीने एका लिंकवर क्लिक केल्याने त्याला तब्बल 9 लाखांचा फटका बसला आहे. नोकरी करणाऱ्या या व्यक्तीने अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी वर्क फ्रॉम होमची जाहिरात पाहून नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र अतिरिक्त पैशांची हीच हाव त्याला महागात पडली आणि होते ते लाखो रुपयेही तो गमावून बसला.


सोशल मीडियावर दिसली पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमधील प्रीतमपुरा येथे राहणाऱ्या हरिन बन्सल नावाच्या व्यक्तीबरोबर हा संपूर्ण प्रकार घडल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. हरिन हा सोशल मीडियावर सर्फिंग करताना त्याला एक पोस्ट दिसली. रोज काही तास घरुन काम करुन भरपूर पैसा कमवा असा दावा करण्यात आला होता. अधिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने हरिनने या पोस्टवरील लिंकवर क्लिक केला असता एक व्हॉट्अस क्रमांकावरील चॅट ओपन झालं. त्यानंतर तेथील संवादादरम्यान एका अनोखळी व्यक्तीने हरिनला एका वेबसाईटची लिंक पाठवली. या लिंकवर जाऊन स्वत:च्या नावाची नोंदणी करावी असं हरिनला सांगण्यात आलं.


आधी पैसे देण्यात आले पण...


या लिंकवर गेल्यानंतर हरिनला घरुन करण्यासारखं डिजीटल माध्यमातील एक टास्क देण्यात आलं. ते पूर्ण केल्यानंतर त्याला काही पैसे भरण्यास सांगितलं गेलं. हे पैसे पुन्हा तुम्हाला दिले जातील आणि त्यावरील कमिशनही दिलं जाईल असं हरिनला सांगितलं गेलं. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये हरिनने पहिल्यांदा पैसे दिले तेव्हा त्याला लगेच ते पैसे आणि कमिशन परत मिळालं. त्यामुळे हरिनला या व्यक्तीवर विश्वास बसला. त्याने त्याच्या खात्यावरील सर्व 9 लाख 32 हजार रुपये या व्यक्तीला पाठवले. मात्र त्यानंतर या व्यक्तीने पैसेच परत केले नाहीत. या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नसल्याचं हरिनच्या लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्याला जाणवलं.


दोघांना अटक


पोलिसांनी या प्रकरणामध्ये 30 वर्षीय अंकित आणि 45 वर्षीय सुधीर कुमार नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र या प्रकरणावरुन पुन्हा एकदा सायबर सुरक्षेसंदर्भातील साक्षरतेची आवश्यकता दिसून येते. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंकवर क्लिक करु नये असं पोलिस सांगतात.