Cyclone Biparjoy: गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ 15 जून रोजी दुपारी 4 ते 8 या वेळेत गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने यापूर्वीच याचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. चक्रीवादळाच्या काळात, लोक आपल्या माणसांशी जोडले राहतील आणि कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवतील यासाठी सर्व दूरसंचार कंपन्या एकत्र आल्या आहेत. सर्व दूरसंचार कंपन्यांनी संयुक्तपणे महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.


इंट्रा-सर्कल रोमिंग 


'इंट्रा सर्कल रोमिंग सर्व्हिस' गुजरातमधील अनेक सर्कलमध्ये लाईव्ह करण्यात आली आहे. ही सेवा 14 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली असून ती 17 जून रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. गुजरात सरकारनेही ट्विटद्वारे नागरिकांना या सेवेची माहिती दिली आणि या सेवेचा वापर कसा करायचा याची माहिती दिली आहे.


इंट्रा-सर्कल रोमिंग सेवा म्हणजे काय?


इंट्रा सर्कल रोमिंगमध्ये, टेलिकॉम ऑपरेटर इतर ऑपरेटरसह नेटवर्क शेअर करतात. नेटवर्क शेअरिंग झाल्यामुळे यूझर्स कोणत्याही नेटवर्कद्वारे कॉल करु शकतात. सर्वसाधारणपणे आपल्याकडे जे सिम उपलब्ध असते त्याच सिम नेटवर्कद्वारे आपण कॉल करू शकतो. जर त्या सिमचे नेटवर्क तुमच्या भागात येत नसेल तर तुम्ही कॉलिंग आणि डेटा ऍक्सेस करू शकत नाही.


वादळ आणि चक्रीवादळांच्या प्रसंगी टेलिकॉम नेटवर्कची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. या कठीण काळात लोक आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहावेत यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी गुजरातमध्ये इंट्रा सर्कल रोमिंग सेवा लागू केली आहे. 


या सेवेमुळे तुम्हाला कोणत्याही नेटवर्कद्वारे कॉल करण्याची परवानगी मिळते. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे जिओचे सिम असेल आणि वादळामुळे जिओचे नेटवर्क येत नसेल, तरी तुम्ही एअरटेल नेटवर्कद्वारे कॉल देखील करू शकता.


ही सुविधा कशी वापरायची?


एका नेटवर्कची अनुपलब्धता असल्यास, तुम्ही दुसरे नेटवर्क वापरून कॉलिंग आणि डेटा सुविधा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. सेटिंग्जमध्ये जा आणि सिम कार्डवर क्लिक करा. येथे तुम्हाला उपलब्ध नेटवर्क सापडतील. तुमच्या परिसरात जे काही नेटवर्क उपलब्ध आहे त्यावर क्लिक करून तुम्ही कॉलिंग आणि डेटाचा आनंद घेऊ शकता.


टेलिकॉम कंपन्या इंट्रा सर्कल रोमिंग सेवेसाठी सामान्यतः अतिरिक्त शुल्क आकारतात, पण गुजरात वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व टेलिकॉम कंपन्यानी ही सेवा पूर्णपणे विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये ही सुविधा १४ जूनपासून सुरू झाली आहे, जी १७ जूनपर्यंत उपलब्ध असेल.