मुंबई : बुलबुल चक्रीवादळानं ओडिशा किनाऱ्यावरील भद्रक गावात धडक दिलीये. त्यामुळे ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपटी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळामुळे बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हे वादळ आता बांगलादेशातील सुंदरबन या त्रिभूज प्रदेशाकडे सरकणार असल्याचा अंदाज कोलकातामधील हवामान खात्याने वर्तविला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलबुल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार सज्ज झालं आहे. आतापर्यंत एक लाख ४३ हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं असून, त्यांना शाळा तसेच निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आलं आहे. ६ एसडीएफ, १० NDRF च्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात. रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत कोलकाता विमानतळावरून विमान उड्डाणंही स्थगित करण्यात आली आहे. 



हवामान खात्याने (IMD)दिलेल्या माहितीनुसार, भारतातील काही भागात बुलबुल वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बर्‍याच भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर त्रिपुरा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पदुच्चेरी येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.




हवामान विभागाने, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक आणि केरळमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात बुलबुल वादळामुळे वाऱ्याचा वेग १४५ ते १५५ किलोमीटर ताशी इतका असण्याची शक्यता आहे.