नवी दिल्ली : ओडिशाच्या किनारपट्टीला दणका दिलेल्या फॅनी चक्रीवादळात ३ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. या चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. ओडिशाच्या किनारपट्टीवर वादळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धडकले. त्यावेळी वादळाचे वारे १७५ ते २०० किमी प्रतितास या वेगाने वाहात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



सोसाट्याच्या या वाऱ्यांमुळे ओडिशात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता हे वादळ हळूहळू उत्तर आणि वायव्येच्या दिशेला सरकायला लागलंय. वायव्येकडे सरकताना या वादळाचा वेग मंदावण्याची चिन्हं आहेत. फॅनी चक्रीवादळाचा व्यास तब्बल ५० किलोमीटरचा आहे असं पॅरादिपच्या रडारवरून समजलंय. त्यामुळे फॅनीचा प्रभाव मोठ्या कालावधीत असणार आहे. वादळाआधीच किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूय. वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सुरक्षेच्या कारणास्तव ओडिशाच्या किनाऱ्यावरून ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


तसेच एनडीआरएफचे ५ हजार जवान तैनात करण्यात आलेत. फॅनी वादळामुळे रेल्वे, विमानसेवा विस्कळीत झालीय. तटरक्षक दलाने विशाखापट्टणम, चेन्नई, पॅराद्वीप, गोपालपूर, हल्दीया, फ्रेजरगंज, कोलकाता या शहरांमध्ये कोणत्याही आपत्तीशी झुंज देण्य़ासाठी ३४ कक्ष सुरू ठेवलेत. 



फॅनी चक्रीवादळाचा तडाखा बसणाऱ्या राज्यांसाठी आधीच एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या प्रचारसभेत बोलताना दिली. या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सरकार पीडित जनतेसोबत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 



फॅनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातलाय. सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर वस्तूंचा खच पडलाय. नागरिकांच्या नुकसानीचा अंदाज वादळाचा जोर ओसरल्यावरच यायला लागणार आहे. मात्र सध्या विविध ठिकाणच्या दृष्यांवरून नुकसान अधिक असल्याचं दिसून येतंय. पाहूया फॅनी चक्रीवादळाचे आज सकाळपासूनची थरारक दृष्ये