मुंबई : Cyclone Yaas या चक्रीवादळात बदल झाला आहे. हे वादळ काही तासात ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता आणि भुवनेश्वर येथील विमानतळ बंद करण्यात आले आहे. विमान उड्डानही थांबविण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 'यास' तीव्र चक्रीवादळाच्या वादळात बदल झाला आहे आणि ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे. येत्या काही तासांत चक्रीवादळ यास किनाऱ्यावरील भागात धडक देईल. दुपारनंतर आणखी धोकादायक स्थिती होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा आणि पश्चिम बंगालसह 8 राज्यांत दिसून येईल.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लँडफॉल होण्यापूर्वी चक्रीवादळ 'यास'चा  (Cyclone Yaas)तांडव दिसू लागले आहे. ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. या वादळाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यात चक्रीवादळ यासमुळे भरतीची परिस्थिती निर्माण होत आहे. समुद्राची पाण्याची पातळी आधीच वाढली आहे. दिघा बीचवर पाण्याची पातळी वाढल्यामुळे आजूबाजूचे परिसर पूर्णपणे जलमय झाले आहेत.



ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ Yaasचा जास्तीत जास्त परिणाम होईल. ओडिशामध्ये पुरी, जगतसिंगपूर, खुर्दा, कटक, भद्रक, बालासोर, गंजम आणि मयूरभंजमधील वादळ अधिक धोकादायक ठरु शकते. त्याचवेळी, पश्चिम बंगालच्या कोलकाता, हावडा, हूगली, मेदिनीपूर, दक्षिण 24 परगना आणि उत्तर 24 परगणा येथे वादळांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. याशिवाय संपूर्ण पूर्व भारतात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पूर्व भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशाशिवाय झारखंड आणि बिहारलाही याचा फटका बसणार आहे, तर दक्षिण भारतात आंध्र प्रदेशात  सर्वाधिक नुकसान होऊ शकते आणि अंदमान निकोबारमध्ये विनाश होण्याची शक्यता आहे. या भागात केवळ ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे वाहू वाहतील शिवाय मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशाशिवाय झारखंड आणि बिहारच्या बर्‍याच भागात पाऊस पडत आहे.